Maharashtra Politics: “वडील म्हणून ज्यांचे नाव लावता त्यांचे तैलचित्र लावताना राजकारण का करता?”; शिंदे गटाचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 09:44 AM2023-01-24T09:44:37+5:302023-01-24T09:46:35+5:30
Maharashtra News: प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे. इतरांना बदनाम करायचे, याची नोंद महाराष्ट्र घेईल, अशी टीका शिंदे गटाने केली आहे.
Maharashtra Politics: हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण विधिमंडळात करण्यात आले. मात्र, यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तैलचित्रावरून नाराजी व्यक्त करताना भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर आता शिंदे गटातील नेत्याने उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. वडील म्हणून ज्यांचे नाव लावता त्यांचे तैलचित्र लावताना राजकारण का करता, अशी विचारणा करण्यात आली आहे.
दुसऱ्यांचे वडील चोरताना स्वतःच्या वडिलांना विसरू नका, असा खोचक टोला लगावत, बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्यामागे हेतू वाईट असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. याला शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उत्तर दिले आहे. तैलचित्र आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला तरी ठाकरे गटाने राजकारण बाजूला ठेऊन या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहिले पाहिजे होते, अशी अपेक्षा रामदास कदम यांनी व्यक्त केली.
उद्धव ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवायला हवा होता
उद्धव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून कार्यक्रमाला यायला हवे होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिवशी तरी ठाकरे गटाने राजकारण बाजूला ठेवायला हवे होते. कारण हा काही राजकीय कार्यक्रम नव्हता. अशा कार्यक्रमातूनही जर राजकारण करत असाल तर चुकीचे आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे आणि इतरांना बदनाम करायचे असेल तर त्याची नोंद महाराष्ट्र घेईल, अशी टीका रामदास कदम यांनी केली. वडील म्हणून ज्यांचे नाव लावता त्यांचे तैलचित्र लावताना राजकारण का करता, असा सवाल रामदास कदम यांनी केला.
दरम्यान, आपण राजकारणात नव्हतात तेव्हापासून आम्ही बाळासाहेबांसोबत होतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊन उद्धव ठाकरे तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी केलीच ना, या शब्दांत हल्लाबोल करत, ज्या प्रमाणे विचारांशी गद्दारी केली त्याचमुळे तुमच्यासोबत आता राजकीय पक्ष कोणतेच नाहीत म्हणून वंचित बहुजन आघाडीला तुम्ही बरोबर घेत आहात, असा टोला रामदास कदम यांनी लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"