Maharashtra Politics: “प्रभू रामचंद्र संजय राऊतांना विचारून आशीर्वाद देतील का?”; शिंदे गटाचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 10:00 AM2023-04-11T10:00:02+5:302023-04-11T10:02:40+5:30
Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अयोध्या दौऱ्यावरून महाविकास आघाडीकडून टीका केली जात आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाकडून शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. यातच आता ठाकरे गटाकडून होत असलेल्या टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. प्रभू रामचंद्र संजय राऊतांना विचारून आशीर्वाद देतील का?, असा खोचक सवाल करण्यात आला आहे.
रामाचे जे सत्य वचन आहे ते तुम्ही कुठून घेणार? तुम्हाला रामाची आठवण आता झाली. जेव्हा तुम्ही पक्ष सोडला तेव्हा तुम्ही सुरत आणि गुवाहाटीला गेलात. तेव्हा तुम्हाला रामाची आठवण जाली नाही का? तेव्हा तुम्ही अयोध्येला गेले असते तर प्रभु श्रीरामाने असत्याच्या बाजूने कौल दिला नसता, हे ढोंग असून, त्यांना श्रीरामाचा आशीर्वाद लाभणार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. याला आता शिंदे गटाचे नेते आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिले.
प्रभू रामचंद्र राऊतांना विचारून आशीर्वाद देतील का?
प्रभू रामचंद्र संजय राऊतांना विचारून आशीर्वाद देतील का? या शब्दांत अब्दुल सत्तारांनी खिल्ली उडवली. तसेच कोलवड येथे आगमन झाल्यावर अब्दुल सत्तार यांनी वादळी, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधत, सरकार बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही अब्दुल सत्तार यांनी दिली. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्यात येईल, असे आश्वासनही सत्तार यांनी दिले.
दरम्यान, देशात अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला आहे. याचा सर्वांत माेठा फटका रब्बी पिकांना झाला आहे. त्यातच स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने यावेळी मान्सून सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. तसे झाल्यास उत्पादनात घट होऊ शकते आणि त्यामुळे येणाऱ्या काळात किमती आकाशाला भिडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी महागाई वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"