Maharashtra Politics: “संजय राऊत यांनी केलेली ‘ती’ भविष्यवाणी खोटी ठरणार”; शिंदे गटाचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 02:08 PM2023-01-10T14:08:18+5:302023-01-10T14:09:11+5:30

Maharashtra News: महाराष्ट्रात कशा पद्धतीने खोटे बोलले जाते. हे जनतेसमोर उघड झाले आहे, असे शिंदे गटाने म्हटले आहे.

shinde group minister deepak kesarkar said thackeray group sanjay raut prediction will not get true | Maharashtra Politics: “संजय राऊत यांनी केलेली ‘ती’ भविष्यवाणी खोटी ठरणार”; शिंदे गटाचा खोचक टोला

Maharashtra Politics: “संजय राऊत यांनी केलेली ‘ती’ भविष्यवाणी खोटी ठरणार”; शिंदे गटाचा खोचक टोला

googlenewsNext

Maharashtra Politics: गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा व सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आज मंगळवारी होणार होती. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगातही शिवसेना व निवडणूक चिन्हांच्या दाव्यावर प्रत्यक्ष सुनावणी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. १४ फेब्रुवारीपासून घटनापीठासमोर सलग ही सुनावणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली. तसेच, व्हॅलेंटाईन डे दिवशी सुनावणी असल्याने सर्वकाही प्रेमाने होईल, असेही ते म्हणाले. यानंतर आता शिंदे गटातील नेत्याने संजय राऊत यांना टोला लगावला आहे. संजय राऊतांनी केलेली भविष्यवाणी खोटी ठरणार असल्याचे म्हटले आहे. 

शिंदे गटातील आमदार आणि मंत्री दीपक केसरकर यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. सर्वोच्च न्यायालयात प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मी यावर अधिक काही बोलणार नाही, असे दीपक केसरकर यांनी नमूद केले. 

संजय राऊत यांनी केलेली ‘ती’ भविष्यवाणी खोटी ठरणार

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता १४ फेब्रुवारीपासून सुनावणी सुरू होणार आहे. संजय राऊत यांनी १५ फेब्रुवारी रोजी विरोधी निर्णय लागेल, असे भाकित केले होते. मात्र, आता संजय राऊत यांचे ते भाकित खरे ठरणार नाही, असे केसरकर म्हणाले. तसेच न्यायालयात सुनावणी सुरू असते, तेव्हा न्यायालयाचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे. सत्तासंघर्षाच्या सुनावणीसंदर्भात कोणतेही भाष्य करणार नाही. मात्र, आमच्याकडील काही लोक सातत्याने विधाने करत असतात की, अमूक पद्धतीने निकाल येणार आहे, तमूक निकाल येणार आहे. शेवटी न्यायालय आपल्या प्रक्रियेप्रमाणे चालत असते. हे यानिमित्ताने सिद्ध झालेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कशा पद्धतीने खोटे बोलले जाते. हे जनतेसमोर उघड झाले आहे. त्यामुळे आता यांच्यावर किती विश्वास ठेवावा हे जनतेने ठरवावे, या शब्दांत दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांनी केलेल्या विधानांचा समाचार घेतला. 

दरम्यान, देशाच्या सरन्यायाधीशांनी ही सुनावणी पुढे ढकलल्याचे सांगितले. त्यावर, दोन्ही गटाच्या वकिलांनी हरकत न घेता, मान्यता दिली आहे.  तसेच, ठाकरे गटाच्या ७ सदस्य खंडपीठाची मागणी अद्याप मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे, पुढील सुनावणी ही ५ न्यायाधीशांच्या खंडपीठात होणार की, ७ न्यायाधीशांच्या खंडपीठात याबाबत निश्चिती नाही. मात्र, सत्ता संघर्षाच्या पुढील सुनावणीसाठी अजून १ महिना वाट पाहावी लागणार आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shinde group minister deepak kesarkar said thackeray group sanjay raut prediction will not get true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.