Maharashtra Politics: “सुषमा अंधारे या राष्ट्रवादीतून पाठवलेलं पार्सल, उरली-सुरली शिवसेनाही संपवून टाकतील”
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 04:12 PM2022-11-04T16:12:01+5:302022-11-04T16:14:43+5:30
Maharashtra News: ठाकरे गटाची ही महाप्रबोधन यात्रा नसून, जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करणारी यात्रा असल्याची घणाघाती टीका शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.
Maharashtra Politics: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेते विविध यात्रा, सभा, दौरे या माध्यमातून पक्ष आणि संघटना एकसंध ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. एकीकडे आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद यात्रा काढत असून, दुसरीकडे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. या दौऱ्यात सुषमा अंधारे यांनी बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटातील अनेक नेत्यांवर घणाघाती टीका केली. या टीकेला शिंदे गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे. सुषमा अंधारे या राष्ट्रवादी काँग्रेसमधून पाठवलेले पार्सल आहे. त्या आता उरलेली शिवसेनाही संपवतील, असा रोखठोक पलटवार करण्यात आला आहे.
गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचा धसका घेतला आहे. पायाखालची वाळू सरकली आहे, म्हणून खोटे गुन्हे दाखल करत आहेत. मात्र आम्ही अशा गुन्ह्यांना भीक घालणार नाही. आम्हाला कोणतीही बंदी घातली तरी महाप्रबोधन यात्रा सुरूच राहील. या सरकारने माफिया आणि गुंडांना हाताशी धरले आहे, बहुजन असल्याने माझ्यावर कारवाई केली जात असल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला. याला शिंदे गटाचे आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.
सुषमा अंधारे या राष्ट्रवादीतून पाठवलेले पार्सल
गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ही महाप्रबोधन यात्रा नव्हे तर जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करणारी यात्रा आहे. हे राष्ट्रवादीचं प्रॉडक्ट आहे. उरली सुरली शिवसेना डॅमेज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुषमा अंधारे यांना पाठवले आहे, असे प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी दिले.
दरम्यान, सुषमा अंधारे यांची शिवसेनेच्यावतीने महाप्रबोधन यात्रा सुरु आहे. जळगावातील एका कार्यक्रमात प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करत त्यांच्या भाषणांवर बंदी घालण्यात आली. त्यावरून शिंदे गट आणि गुलाबराव पाटील तसेच सुषमा अंधारे आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी घडताना दिसत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"