"एखाद्या नवरीनं घर सोडावं तसं उद्धव ठाकरेंनी 'वर्षा' बंगला सोडताना सोंग घेतलं"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 10:17 AM2022-09-25T10:17:44+5:302022-09-25T10:18:48+5:30
कामाचं बाजूला राहिलं पण अडीच वर्ष उद्धव ठाकरे कुणाला भेटले नाही असं शिंदे गटाचे मंत्री भुमरे म्हणाले.
औरंगाबाद - ज्या दिवशी वर्षा बंगल्यातून बाहेर पडायचं तेव्हा कोरोना झाला होता, आदल्यादिवशी मास्क घातलं होते. मात्र एखादी मुलगी लग्न झाल्यानंतर सासरी जाते तसं सोंग उद्धव ठाकरेंनी केले. घराबाहेर रडारडी, पळापळी झाली अशा शब्दात शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
संदीपान भुमरे म्हणाले की, कामाचं बाजूला राहिलं पण अडीच वर्ष उद्धव ठाकरे कुणाला भेटले नाही. आपण फक्त त्यांना टीव्हीत पाहिले. आम्हीपण बऱ्याच वेळा टीव्हीत पाहिले. टीव्ही सुरू केली की उद्धव ठाकरे आम्हाला दिसायचे. टीव्ही बंद केली की दिसत नव्हते. कोरोनाचं एवढं मोठं संकट आले उद्धव ठाकरे एकाही जिल्ह्यात गेले नाहीत. आदित्य ठाकरे एकाही जिल्ह्यात फिरकले नाहीत. मात्र आता त्यांना सगळीकडे जायला वेळ आहे. पण सत्ता होती तेव्हा त्यांना कुठे जायला वेळ नव्हता असं त्यांनी सांगितले.
'त्याने'च ठाकरेंना CMपदावरुन हटवण्याबाबत गळ घातली होती
शिवसेनेच्या निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद यात्रेला उत्तर म्हणून शिंदे गटाकडून हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रा सुरू करण्यात आली आहे. या यात्रेतील एका कार्यक्रमात बोलताना शिंदे गटातील नेते आणि राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना मोठा गौप्यस्फोट केला. शिंदे गटातून शिवसेनेत परतलेले आमदार नितीन देशमुख यांनीच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरे यांना पदावरून हटवून स्वत: मुख्यमंत्री होण्याची गळ घातली होती असं त्यांनी म्हटलं.
ठाण्यावरून सुरतकडे जात असताना कारमध्ये एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, नितीन देशमुख यांच्यासह मी स्वत: होतो, असे संदिपान भुमरे यांनी म्हटले. त्यावेळी नितीन देशमुख यांनीच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्याची गळ घातली. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून खेचत तुम्ही स्वत: मुख्यमंत्री व्हा, असे देशमुखांनी एकनाथ शिंदेंना म्हटले होते, असे भुमरे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे हे आमदारांना सोडा, कॅबिनेट मंत्र्यांनादेखील भेटत नव्हते. लाजेखातर पक्षप्रमुख आम्हाला भेटतात असे खोटे बोलावे लागत होते, अशी खंत भुमरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.