“भास्कर जाधव सिनियर नेते, मार्गदर्शन-अनुभवाची गरज, पक्षात आले तर आवडेल”; शिंदे गटाची खुली ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 18:43 IST2025-01-14T18:43:28+5:302025-01-14T18:43:52+5:30
Shiv Sena Shinde Group Uday Samant News: भास्कर जाधव यांच्या पक्षप्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असे मत नेत्यांनी मांडले आहे.

“भास्कर जाधव सिनियर नेते, मार्गदर्शन-अनुभवाची गरज, पक्षात आले तर आवडेल”; शिंदे गटाची खुली ऑफर
Shiv Sena Shinde Group Uday Samant News: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरातील अनेक ठिकाणचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक उद्धवसेनेला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गट, भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठाकरे गटाने केली असली, तरी पक्षाला लागत असलेली गळती सुरूच असल्याचे दिसत आहे. संजय राऊतांनी ठाकरे गटाची स्वबळाची भूमिका मांडली. यापुढे आता भास्कर जाधव यांनी केलेल्या विधानावरून आता प्रतिक्रिया उमटत आहेत.
पदांचा म्हणजे शाखाप्रमुख वगैरे पदांचा कालावधी जर निश्चित केला. तर तेवढ्या कालावधीमध्ये काम करण्याकरिता ते स्पर्धा करतील. नपेक्षा आता आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली आहे. जवळजवळ काँग्रेसच झाली आहे. हे बोलताना वेदना होतात. एखाद्या गावात शिवसेनेचा कार्यक्रम असला की त्या गावातील शाखाप्रमुखाच्या अंगात संचार झालेला असायचा. आता शाखाप्रमुख कोण आहेत, किती आहेत, कुठे आहेत, याचा पहिल्यांदा आढावा घ्यायला हवा. काही पदाधिकारी दहा-पंधरा वर्षांपासून एका जागेवर मस्तपैकी बसलेले आहेत. माझ्या पदाला कुणी हात लावू शकत नाही, असा त्यांचा समज झालेला आहे. मी कुठल्यातरी नेत्याची मर्जी सांभाळली की, माझे पद शाबूत, आहेत कुठे हे शाखाप्रमुख? असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया देताना अप्रत्यक्षरित्या भास्कर जाधव यांना शिंदे गटात येण्याची ऑफर दिल्याचे सांगितले जात आहे.
भास्कर जाधव सिनियर नेते, मार्गदर्शन-अनुभवाची गरज, पक्षात आले आवडेल
भास्कर जाधव जे आता बोलत आहेत, ते आम्ही अडीच वर्षांपूर्वी केले. आता त्यांची घुसमट का होत आहे, हे त्यांना विचारा. भास्कर जाधव सिनियर नेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाची, अनुभवाची आम्हाला गरज आहे. भास्कर जाधवांना शिवसेना पक्षात घ्यायचे की नाही हा निर्णय शिंदे साहेब घेतील. पण, मी सांगतो ते खूप मोठे नेते आहेत, आम्हाला ते आमच्या पक्षात आले तर आवडेल, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
दरम्यान, भास्कर जाधव काय बोलले हे माध्यमातून समजत आहे. त्यांच्याशी चर्चा करेन. भास्कर जाधव यांचा राजकारणाचा अनुभव दांडगा आहे. पक्ष संघर्ष आणि संकटातून जात असताना आमच्यासारख्या नेत्यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.