"मुख्यमंत्र्यांनी शाळेत पहारा द्यायचा का?"; अत्याचाराच्या घटनेवर CM शिंदेंच्या आमदाराचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 01:39 PM2024-08-27T13:39:30+5:302024-08-27T13:51:26+5:30
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे बदलापूर प्रकरणावरुन धक्कादायक विधान केलं आहे.
Badlapur School Crime : बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांनी देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शाळेचा सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला या प्रकरणात फाशी देण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केलीय. दुसरीकडे विरोधकांनी महायुती सरकारला या प्रकरणावरुन धारेवर धरलं आहे. महाविकास आघाडीने या घटनेबाबत राज्यभरात निषेध देखील नोंदवला होता. अशातच आता शिंदे गटाच्या आमदाराने या प्रकरणावरुन धक्कादायक विधान केलं आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या या विधानावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणावरुन एकीकडे देशभरात रोष व्यक्त होत असताना बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी धक्कादायक विधान केलं आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपीला फाशी देण्याची मागणी होत असताना सत्ताधारी आणि विरोधक या प्रकरणावरुन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. अशातच आमदार संजय गायकवाड यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देताना केलेल्या विधानाने वातावरणं आणखी तापलं आहे. अशा प्रकारच्या घटना घडत असतात, मग आता काय मुख्यमंत्री राज्यातील शाळांमध्ये जाऊन पहारा देतील का? असं विधान संजय गायकवाड यांनी केलं.
"बदलापूरची घटना दुर्दैवी आहे. हा गुन्हा करणारी एक विकृती आहे. पण विरोधक या घटनेवरून राजकारण करत आहेत. काल आंदोलन पाहिलं सर्व पक्ष त्याच्यावर थयथयाट करत होते. या घटनेला सरकारला जबाबदार धरत आहेत. पण आता काय मुख्यमंत्री राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये जाऊन पहारा देणार आहेत का? की पोलीस अधिक्षक त्यांच्या घरी जाऊन बसणार आहेत? आरोपी गुन्हा करण्यापूर्वी पोलिसांना फोन करून सांगतो का?” असा सवाल आमदार संजय गायकवाड यांनी केला.
“मुळात अशा प्रकाराच्या घटना घडत असतात. त्या हाताळण्यासाठी एक व्यवस्था असते. राज्यात पोलीस यंत्रणा आहे. पोलिसांकडून असे प्रकरणं हाताळल्या जात नसेल तर ती सीबीआयकडे सोपवली जातात. पण आरोपीला सोडलं जात नाही. पण अशा घटनांचं राजकारण करण्यापेक्षा नराधमांना शिक्षा कशी मिळेल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. पण असे प्रयत्न होताना दिसत नाही. विरोधक कुठलीही घटना घडली की त्याचं राजकारण करतात”, असेही संजय गायकवाड म्हणाले.