Maharashtra Politics: “एकनाथ शिंदेंचा हा विजय आहे, निवडणूक आयोगाने भावनेची कदर केली”: शहाजीबापू पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 11:02 AM2022-10-11T11:02:23+5:302022-10-11T11:03:26+5:30
Maharashtra News: बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर काँग्रेस, राष्ट्रवादीला विरोध केला. मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासोबतच युती केली, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली.
Maharashtra Politics: केंद्रीय निवडणूक आयोगाने नाव आणि अधिकृत असलेले धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. यातच शिवसेनेला मशाल हे नवे चिन्ह मिळाले आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) या नावालाही निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव मिळाले आहे. तसेच निवडणूक चिन्ह म्हणून तळपता सूर्य हे नवे चिन्ह मिळण्याची शक्यता आहे. यावर शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव एकनाथ शिंदेंना गटाच्या शिवसेनेला दिले. ४० आमदार आणि १२ खासदारांच्या भावनेची आयोगाने कदर केली. बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर काँग्रेस, राष्ट्रवादीला विरोध केला. मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यांच्याबरोबर केलेल्या युतीने शिवसेनेत दरार निर्माण केली. त्यामुळेच महाराष्ट्रातील शिवसेना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली उभी राहिली. प्रामाणिक आणि नैतिकतेने काम करणाऱ्या एकनाथ शिंदेंचा हा विजय आहे, असे शहाजी बापू पाटील यांनी सांगितले.
७० टक्क्यांपेक्षा जास्त मतांची आकडेवारीही आमच्याकडे होती
दुसरीकडे, बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. अंधेरी पोटनिवडणूक आम्ही युती म्हणून लढवणार आहोत. निवडणूक आयोगाकडे आम्ही धनुष्यबाण हे चिन्ह मागितले होते, पण ते मिळालेले नाही. ही आमच्यासाठी एक दु:खद घटना आहे. कारण, शेवटी बहुमतावर आतापर्यंत निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय जर पाहिले तर ज्या पक्षाकडे बहुमत असते. ज्या पक्षाकडे विधीमंडळात बहुमत आणि संघटनात्मक बहुमत असते त्याला चिन्ह मिळते. कारण, चिन्ह देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. आमच्याकडे विधानसभा, लोकसभेत जवळपास ७० टक्के बहुमत आहे. ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतांची आकडेवारीही आमच्याकडे होती” असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"