“राज-उद्धव यांचे भांडण कधीच मिटले असते, परंतु...”; शिंदे गटाच्या खासदाराचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 01:20 PM2023-08-29T13:20:13+5:302023-08-29T13:23:31+5:30
Raj Thackeray And Uddhav Thackeray: ४० आमदार, १३ खासदार सोडून का गेले? याचे चिंतन उद्धव ठाकरेंनी केले नाही. त्यांना नात्याचे महत्त्व नाही, असा पलटवार शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.
Raj Thackeray And Uddhav Thackeray: आधी शिवसेना आणि त्यानंतर एका वर्षाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे बंड झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. यातच हिंगोलीत उद्धव ठाकरेंनी निर्धार सभेला संबोधित करताना शिवसेना शिंदे गटावर सडकून टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना, शिंदे गटातील खासदारांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे कधीच मिटले असते, असा दावा केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीच्या सभेत खासदार भावना गवळी यांच्यावर टीका केली. गेल्या वर्षीचे रक्षाबंधन तुम्हाला आठवते का? पंतप्रधानांना राखी बांधतानाचा एकच फोटो आला होता. पंतप्रधानांना राखी बांधली आणि ईडीची चौकशी थांबली, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. याला भावना गवळी यांनी उत्तर दिले.
राज-उद्धव यांचे भांडण कधीच मिटले असते, परंतु...
उद्धव ठाकरे यांनी पवित्र नात्यावर सतत वक्तव्य केले आहे. कदाचित उद्धव ठाकरे यांना नात्याचे महत्त्व कळत नसेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे भांडण कधीच संपले असते. पण, उद्धव ठाकरेंनी त्यावर निर्णय घेतला नाही. देवेंद्र फडणवीसांबरोबरही उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली. उद्धव ठाकरे यांनी कधीही कोणाला चांगली वागणूक दिली नाही. ४० आमदार आणि १३ खासदार सोडून का गेले? याचे चिंतन उद्धव ठाकरे यांनी केले नाही. मी पाचवेळा खासदार म्हणून निवडून आली. माझ्या मतदारसंघात २४ वर्षापासून रक्षाबंधनाचा कार्यक्रम राबवत आहे. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांना राखी बांधली आहे. या बंधनावर उद्धव ठाकरे यांनी बोलू नये. उद्धव ठाकरे यांनी कधीही बंधन पाळले नाही. म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे, या शब्दांत भावना गवळी यांनी सडेतोड पलटवार केला.
दरम्यान, पक्षातील खासदार आमदार यांच्यासोबतही ते नाते जपू शकले नाहीत. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला. २०१४ मध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले होते. मात्र त्यांच्यावरही टीका करीत आहे. जे एकनाथ शिंदे खांद्याला खांदा लावून उद्धव ठाकरेंसोबत काम करीत होते, त्यांच्यावर टीका केली जात आहे. स्वतः नाते जपण्यात अपयशी ठरायचे आणि दुसऱ्यावर टीका करायची हा मूळात त्यांच्यातील दोष असल्याचा आरोप भावना गवळी यांनी केला.