Maharashtra Politics: “जितेंद्र आव्हाडांनी औरंगजेबाचे मंदिर उभारावं अन् पवार, राऊत, ठाकरेंना उद्घाटनाला बोलवावं”
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 09:49 AM2023-01-03T09:49:57+5:302023-01-03T09:51:19+5:30
Maharashtra News: जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या सोयीने इतिहास मांडतात, असा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.
Maharashtra Politics: अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानासाठी माफी मागावी, अशी मागणी करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी संभाजी महाराजांबद्दल, सावरकर आणि गोळवलकर यांनी केलेल्या विधानाबद्दल माफी मागावी, अशी मागणी आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली. तसेच औरंगजेब क्रूर, हिंदूद्वेष्टा नसल्याचे विधानही केले. यानंतर आता शिंदे गटाकडून जितेंद्र आव्हाडांवर टीका करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाचे मंदिर उभारावे आणि त्याच्या उद्घाटनाला पवार, राऊत आणि ठाकरेंना बोलवावे, असे म्हटले आहे.
बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या सोयीने इतिहास मांडतात, असा आरोप करत, जितेंद्र आव्हाड यांनी आता औरंगजेबाचे मंदिर उभारावे आणि उद्घाटनाला अजित पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना बोलवावे, असा खोचक टोला नरेश म्हस्के यांनी लगावला.
राष्ट्रवादीकडून कायमच हिंदू धर्माचा, हिंदू धर्मातील तत्त्वांचा अपमान
जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी वेगळा इतिहास कुणी लिहिला असेल तर माहिती नाही. औरंगजेबाला हिंदू धर्माचा तिरस्कारच होता. त्यामुळेच संभाजीराजेंचे अतोनात हाल करत त्यांची हत्या औरंगजेबाने केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कायमच हिंदू धर्माचा आणि हिंदू धर्मातील तत्त्वांचा अपमान केला जातो. छत्रपती संभाजी महाराजांनी मुस्लिम धर्म स्वीकारला नाही त्याऐवजी आपल्या प्राणांची आहुती दिली. मग त्यांना धर्मवीर का म्हणायचं नाही? अशी विचारणा म्हस्के यांनी केली.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्य रक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला दिली कुणी? इथेच तर खरा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आले तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचे मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचे मंदिरही फोडले असते. तिथून छत्रपती संभाजीराजेंना तुळापूरला नेण्यात आले. त्यानंतर पुढे काय झाले तो इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"