"...तर फडणवीस मुख्यमंत्री होतील"; महाजनांच्या विधानावर शिंदे गट म्हणतो, "आम्ही वाद घालणार नाही, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 02:08 PM2024-09-18T14:08:31+5:302024-09-18T14:10:23+5:30
मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानानतंर शिंदे गटाने नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्षातील नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागा वाटप अद्याप जाहीर झालेलं नसली तर मुख्यमंत्रीपदाबाबत पक्षांमध्ये रस्सीखेंच सुरु झाली आहे. मात्र भाजप नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पदाचे चेहरे असल्याचे म्हटलं आहे. महाजन यांनी केलेल्या या दाव्यावर आता शिवसेना शिंदे गटानेही भाष्य केलं आहे. आमच्या मनात एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असल्याचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विविध पक्षांच्या नेत्यांकडून जोरदार विधाने केली जात आहेत. कुठे कोणी आपल्या नेत्याला मुख्यमंत्री बनवण्याच्या चर्चा करत आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारचे मंत्री गिरीश महाजन यांनी देवेंद्र फडणवीस हे भाजपचे मुख्यमंत्री असतील, असे विधान केले आहे. पहिल्यांदाच भाजपच्या एका मोठ्या नेत्याने मुख्यमंत्री पदाबाबत असं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. महाजन यांच्या या विधानावर आमदार संजय शिरसाट यांनीही प्रतिक्रिया देत महत्त्वाचे वक्तव्य केलं.
"भाजपामध्ये एकच चेहरा आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. भाजपाचा मुख्यमंत्री होत असेल तर देवेंद्रजीच होतील. पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत, पण आमच्या मनातला मुख्यमंत्री भाजपाचा असेल तर देवेंद्रजी आहेत," असं गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं.
सगळं निवडणुकीच्या नंतर ठरेल - संजय शिरसाट
"गिरीश महाजन यांच्या मनात देवेंद्र फडणवीस आहेत तर माझ्या मनात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आहेत. हे सर्व आमच्या मनात आहेत. पण या सगळ्याचा निर्णय वरिष्ठ मिळून घेतील. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार यावर आम्ही वाद घालणार नाही. पण मनात असणे आणि प्रत्यक्षात येणं हे निवडणुकीच्या नंतर ठरेल," असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तर ते तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. यापूर्वी ते २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळात ते मुख्यमंत्री होते.