शिंदे गटाच्या नेत्याने सांगितले राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य; म्हणाले, “सगळा पक्ष भाजप...”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 07:57 PM2023-05-04T19:57:47+5:302023-05-04T19:59:32+5:30
Sharad Pawar: राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहामुळे शरद पवार यांनी निवृत्ती घेतली, असा दावा करण्यात आला आहे.
Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होत निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल, याबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. तसेच यासंदर्भात राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता शिंदे गटाकडून प्रतिक्रिया आली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत भाष्य करण्यात आले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी शरद पवार यांची निवृत्तीची घोषणा आणि त्यानंतरच्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहामुळे शरद पवार यांनी राजीनामा दिला. शरद पवारांनी घेतलेला हा निर्णय विचारअंती घेतलेला आहे. भाकरी फिरवायची सुरूवात पवारांनी स्वतःपासून केली आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
भविष्यात राष्ट्रवादीत प्रचंड मोठे बदल होणार
आता भविष्यात राष्ट्रवादीत प्रचंड मोठे बदल होणार असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस आता आली तर पूर्ण राष्ट्रवादी भाजपासोबत येईल त्यातील एखादा गट येईल असे वाटत नाही, असेही शिरसाट यांनी म्हटले आहे. आमच्या विचारांशी राष्ट्रवादीने जुळवण घेतले तर आम्ही स्वागतच करू. संजय राऊत हे पक्ष तोडण्यासाठी काम करत असतात. शिवसेना पक्ष खरे तर संजय राऊतांनी संपवला. राष्ट्रवादी संपवण्याचाही प्रयत्न त्यांनीच केला, असा आरोप संजय शिरसाट यांनी केला. तसेच जयंत पाटील आणि अजित पवार मोठे नेते आहेत. त्यामुळे अंतर्गत प्रश्नावर आपल्यासारख्या लोकांनी काही बोलणे योग्य नाही, असे संजय शिरसाट म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडी ही आता संपलेली आहे. ही आघाडी आता राहिलेली नाही तरीही याआधी घेतलेल्या सभा या उद्धव ठाकरे गटाने ओढलेल्या सभा होत्या, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.