Maharashtra Politics: “राणा दाम्पत्य हे देवेंद्र फडणवीसांचे भक्त, पण...”; शिंदे गटातील आमदाराची सूचक प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 01:54 PM2023-01-13T13:54:33+5:302023-01-13T13:55:29+5:30
Maharashtra News: देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले होते.
Maharashtra Politics: राज्यातील राजकारण विविध मुद्द्यांवरून तापलेले पाहायला मिळत आहे. अनेकविध विषयांवरून महाविकास आघाडीचे नेते आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्याचे सांगितले जात आहे. यावर शिंदे गटातील आमदाराने सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असे विधान खासदार नवनीत राणा यांनी एका प्रचारसभेदरम्यान केले. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: व्यासपीठावर उपस्थित होते. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी नवनीत राणा यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले आहे.
राणा दाम्पत्य हे देवेंद्र फडणवीसांचे भक्त, पण...
राणा दाम्पत्य हे देवेंद्र फडणवीसांचे भक्त आहेत. एखाद्याचे भक्त असणे काही चुकीचे नाही. त्यामुळे त्यांना फडणवीस मुख्यमंत्री आहेत, हे वाटणे साहाजिक आहे. यामागे त्यांची भावना चांगली आहे. मी एकनाथ शिंदेंना मानतो, मग मी पण म्हणेल की एकनाथ शिंदे २५ वर्ष मुख्यमंत्री राहायला हवे. त्यामुळे नवनीत राणा यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे आणि यात काहीही चुकीचे नाही, असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
नेमके काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा?
देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनात मुख्यमंत्री आहेत. तेच महाराष्ट्राचा विकास करू शकतात. गोवा, गुजरात ज्या ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे पाऊल पडले, तिथे आपण न्यायासाठी लढणारा व्यक्ती बघितला. त्यांच्या पाठिशी आपण सगळ्यांनी उभे राहिले पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, आपण उपमुख्यमंत्री आहात. पण ज्या प्रकारे तुमच्या कामाचा आवाका आहे आणि तुम्ही ज्या प्रकारे आमच्या सगळ्यांची कामे करता ते पाहून आमच्या मनातील मुख्यमंत्री तुम्हीच आहात, असे नवनीत राणा यांनी म्हटले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"