सुप्रीम कोर्टातील निकालापूर्वी एकनाथ शिंदे राजीनामा देणार? शिंदे गटाची सूचक प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 05:13 PM2023-05-10T17:13:47+5:302023-05-10T17:16:33+5:30
Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वीच एकनाथ शिंदे राजीनामा देतील, असा दावा करण्यात आला होता.
Maharashtra Politics: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी निकाल येऊ शकतो. भारताचे सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी याबाबत संकते दिले आहेत. यावरून आता राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी तसेच शिंदे गट आणि भाजप नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. यातच सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार का, असे कयास बांधले जात आहेत. यावर शिंदे गटातील नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.
कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता असीम सरोदे यांनी व्यक्त केली. असीम सरोदे यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर इतरांनी बोलणे चुकीचे आहे
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय सोडून इतरांनी बोलणे चुकीचे आहे. वकिलांच्या विधानावर अंदाज बांधणे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार, याचा अंदाज लावणं कुणालाही शक्य नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत अंदाज व्यक्त करणे, हे कायदेतज्ज्ञांच्याही पलीकडचे आहे, असे मला वाटते. न्यायालयात कोणताही खटला सुरू असला तरी दोन वकील दोन्ही बाजुने आपापली बाजू मांडत असतात. प्रत्येक वकील आपलीच बाजू बरोबर आहे, हे न्यायालयाला पटवून देत असतो, असे शहाजी बापू पाटील यांनी असीम सरोदे यांच्या दाव्यावर बोलताना म्हणाले.
दरम्यान, न्यायव्यवस्थेत वकील ही अशी व्यक्ती असते, जी आधीपासून मनात ठरवलेल्या बाजुनेच युक्तिवाद करते. आपलीच बाजू पटवून देण्याचे काम वकील करतात. त्यामुळे वकिलांच्या विधानावर अंदाज बांधणं योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अंदाज कुणालाही घेत येऊ शकत नाही, असे शहाजीबापू पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.