Gujrat Election Result 2022: “सर्वसामान्यातून चहा विकणाऱ्या माणसाला गुजरातच्या जनतेने मनापासून आशीर्वाद दिला”
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 11:34 PM2022-12-08T23:34:21+5:302022-12-08T23:35:16+5:30
Gujrat Election Result 2022: भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी खास गुजराती भाषेतून शुभेच्छा दिल्या.
Gujrat Election Result 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय झाला असून, सातव्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. गुजरातमध्ये भाजपाने सर्वाधिक १५६ जागा मिळवत दमदार कामगिरी केली आहे. तर, काँग्रेसला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटातील नेत्यांनीही भाजपला या प्रचंड विजयाबाबत शुभेच्छा दिल्या. यातच शहाजीबापू पाटील यांनी आपल्या खास शैलीत गुजराती भाषेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजराती जनतेचे अभिनंदन केले.
गुजराती भाषेतून तुम्ही शुभेच्छा कशा द्याल? असे विचारले असता, भाजपानू कमळ फरी एक बार खिलाया, गुजरात जनतेनूबद्दल खूप अभिनंदन, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच गुजरातमधील जनतेने सातव्यांदा भाजपला निवडून दिले आहे. येथील जनतेने पुन्हा भाजपवर विश्वास व्यक्त केला आहे. विक्रमी असा निकाल लागला आहे, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले आहे.
स्वार्थ अभिमान गुजरातच्या जनतेने बाळगला
गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून पंतप्रधान पदाकडे गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आज जागतिक पातळीवर गेले आहे. जगाने त्यांच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे. त्याचा स्वार्थ अभिमान गुजरातच्या जनतेने बाळगला आणि गुजरातच्या जनतेने भरभरुन सर्वसामान्यातून चहा विकणाऱ्या माणसाला मनापासून दिलेला आशीर्वाद आहे, असे शहाजीबापू पाटील म्हणाले.
दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह आणि गुजरातच्या नागरिकांचे अभिनंदन करतो. एक चांगला निकाल आला आहे. भाजपला गुजरातमध्ये १५० पेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीमही गुजरातमध्ये प्रचारासाठी गेले होते. त्यांचेही मनापासून अभिनंदन करत आणि सर्वांना शुभेच्छा देतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"