शिंदे गटाला हवी मुदतवाढ, ठाकरे गट म्हणतो, विधानसभा अध्यक्षांची नोटीस मिळाली नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 09:17 AM2023-07-11T09:17:25+5:302023-07-11T09:18:01+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेसंदर्भातील कारवाईला सुरुवात केली आहे.
मुंबई - विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ५४ आमदारांना नोटीस बजावल्यानंतर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशातच नोटीस मिळालेल्या शिंदे गटातील आमदारांनी मत मांडण्यासाठी मुदतवाढ मागणार असल्याचे सांगितले आहे, तर ठाकरे गटातील आमदारांकडून मात्र नोटीस मिळाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेसंदर्भातील कारवाईला सुरुवात केली आहे. नोटीस मिळाल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले, या नोटिशीवर आमचे आणि पक्षाचे वकील उत्तर देणार आहेत; परंतु त्यासाठी काही कालावधी लागू शकतो. उत्तर देण्याकरता आम्ही मुदतवाढ मागून घेणार आहोत. ठाकरे गटाचे पक्षप्रतोद सुनील प्रभू म्हणाले की, आम्हाला कोणतीही नोटीस मिळालेली नाही. नोटीस मिळाल्यावर कायदेशीर उत्तर देऊ. बऱ्याच आमदारांना नोटीस मिळालेली नाही.
...तर ते १६ आमदार अपात्र ठरतील : झिरवळ
सर्व बाजूने विचार केला तर शिवसेनेचे ते १६ आमदार अपात्र आहेत; पण हा निर्णय शेवटी अध्यक्षांकडे असेल, त्यांच्याकडे शेवटचे अधिकार आहेत. त्यामुळे मी त्यांच्यावर वक्तव्य करणे उचित ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिली
नोटिशीत काय?
याआधीच्या नोटिशीनुसार २७ जून २०२२ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत लेखी अभिप्राय सादर करण्यास कळविण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने १२ जुलै २०२२ रोजी लेखी अभिप्राय देण्यास मुदतवाढ दिली होती. मात्र अद्यापपर्यंत अभिप्राय प्राप्त झालेले नाहीत.
पत्र प्राप्त झाल्याच्या दिनांका- पासून सात दिवसांच्या आत लेखी अभिप्राय सादर करावा. दिलेल्या मुदतीत तो सादर न केल्यास आपणास या अर्जाबाबत काहीही म्हणायचे नाही, असे समजून सदर अर्जावर निर्णय घेतला जाईल, असे या नोटिशीत नमूद आहे.