उद्धव ठाकरेंच्या उमेदवार यादीवर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; 'ज्याने युती तोडली, तोच आघाडी तोडणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 02:46 PM2024-03-27T14:46:00+5:302024-03-27T14:48:25+5:30
Rahul Shewale on Uddhav Thackeray Candidate List: उद्धव ठाकरेंवर काँग्रेस टीका करत असताना आता ठाकरे गटाच्या यादीवर शिंदे गटाचे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेना गटाची १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आणि महाविकास आघाडीत भुकंप झाला. त्यानंतर काहीच वेळात वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी देखील ९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आंबेडकर यांनी दोन जागांवर काँग्रेसला पाठिंबा दिला आहे, तर सहा जागांवर काँग्रेस, ठाकरे गटाविरोधात उमेदवार जाहीर केले आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी चर्चा अपूर्ण असतानाच आपल्या दोन जागांवर उमेदवार जाहीर करून आघाडी धर्माला गालबोट लावल्याचे आरोप काँग्रेसने केले आहेत. या सर्वावर आता एकनाथ शिंदे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे.
ठाकरे गटाच्या यादीवर शिंदे गटाचे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी टीका केली आहे. ज्या लेटर हेडवर यादी आली त्यावर बाळासाहेबांचे नाव छोट्या अक्षरात आहे. बाळासाहेबांचे नाव स्वतःच्या नावात देखील लिहिलेले नाही. सभेत हिंदू बोलण्याऐवजी राष्ट्र म्हणाले. ही यादी ट्विटरच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली. त्याच अनिल देसाईंचे नावही नव्हते, ते देखील ट्विटरवरून दिले, ही पराभवाची मानसिकता असल्याची टीका शेवाळे यांनी केली आहे.
महाविकास आघाडीत एकमत नाही. इतर घटक पक्ष नाराज आहेत. युती तोडली तिच व्यक्ती महाविकास आघाडी तुटण्यास कारणीभूत ठरणार आहे. महाविकास आघाडीत बिघाडी दिसून येईल, याचे कारण संजय राऊत ठरतील. अनिल देसाई हे शिवसेना नेते आहेत. त्यांच्या हाताखाली काम केले आहे. मात्र, त्यांना उमेदवारी देण्यात खूप उशीर झाला आहे. इथे कोणी कितीही प्रचार केला तरी बाळासाहेबांच्या विचारांचा विजय होणार आहे. लोक बाळासाहेब आणि बाळासाहेबांच्या विचारांचा माणूस इथून निवडून देतील, असे शेवाळे म्हणाले.
तसेच ईडी स्वतंत्र यंत्रणा आहे. चौकशी आणि कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. भ्रष्टाचार केला असेल तर समोर यावे लागेल. भ्रष्टाचार केला असेल तर त्याला का उमेदवारी द्यावी याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाला द्यावे लागेल, असे अमोल किर्तीकरांवरील ईडी कारवाईवर शेवाळे म्हणाले आहेत. तसेच महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे, आज किंवा उद्या नावे जाहीर होऊ शकतात, असे शेवाळे यांनी स्पष्ट केले आहे.