शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना धक्का; शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता बदलला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 10:37 PM2022-08-27T22:37:38+5:302022-08-27T22:38:05+5:30
यापूर्वी, शिवसेना मध्यवर्ती कार्यालय म्हणून दादर येथील शिवसेना भवनाचा उल्लेख केला जात होता. पण आता...
शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास 40 आमदारांना घेऊन, शिवसेनेत बंडाचे निशाण फडकावले आणि राज्यात भाजप-शिवसेना (एकनाथ शिंदे गट) युतीचे सरकार आले. एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयाला संपूर्ण राज्यातून जोरदार पाठिंबा मिळतानाही दिसत आहे. मात्र, दुसरी कडे, शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आता तर, शिंदे गटाकडून जारी करण्यात आलेल्या एका नियुक्ती पत्रावर शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय म्हणून, थेट ठाण्याच्या टेंभी नाका येथील आनंदआश्रमचा पत्ता देण्यात आला आहे.
यापूर्वी, शिवसेना मध्यवर्ती कार्यालय म्हणून दादर येथील शिवसेना भवनाचा उल्लेख केला जात होता. शिंदे गटाने आता यशवंत जाधव याची मुंबईच्या विभागप्रमुख पदावर नियुक्ती केली आहे. यासंदर्भात, त्यांना देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रावर नव्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा, म्हणजेच टेंभी नाका येथील आनंदआश्रमचा पत्ता देण्यात आला आहे. तत्पूर्वी, पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यशवंत जाधव यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. ते शिवसेनेत उपनेते पदावर कार्यरत होते.
दसरा मेळाव्यात खोडा? -
शिवसेनेची शान असलेल्या दसरा मेळाव्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केले जात असल्याचे बोलले जात आहे. खरे तर, शिवसेना आणि दसरा मेळावा, हे एक अतूट नाते आहे. या निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिक येत असतात. मात्र, यंदा पाच ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कुणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात रस्सीखेच सुरू असल्याचे वृत्त आहे.
शिवसेनेतील या दोन्ही गटांकडून अनेक गोष्टींवर दावे केले जात आहेत. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेनेने मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. मात्र त्यांना परवानगी देण्यासाठी खुद्द महापालिकेनेच आखडता हात घेतल्याचे समजते. यासंदर्भात खुद्द उद्धव ठाकरे यांनीही महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याशी संवाद साधल्याचे समजते. मात्र, अद्याप त्यांना परवानगी मिळाली नसल्याचे बोलले जात आहे.