कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेना-मनसेची युती! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्रात येईल तेव्हा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 22:26 IST2026-01-22T22:24:10+5:302026-01-22T22:26:41+5:30
Devendra Fadnavis On Shiv Sena MNS Alliance: कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेसेना मनसे एकत्र आले आहेत. नव्या स्थानिक समीकरणाबद्दल दावोसमध्ये असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला.

कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेना-मनसेची युती! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्रात येईल तेव्हा..."
Devendra Fadnavis mns Shiv Sena Alliance: महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर गेले. ते दावोसमध्ये असतानाच कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेसेनेने मनसेला सोबत घेतले. या नव्या राजकीय समीकरणाने उद्धवसेना-मनसे युतीतही ठिणगी पडल्याचे दिसत आहे. तर भाजपातही स्थानिक पातळीवर अस्वस्थता दिसत आहे. याच राजकीय घडामोडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी संयतपणे उत्तर दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दावोस दौऱ्यात झालेल्या गुंतवणूक करारांबद्दल माहिती दिली. राज्यातील कोणत्या-कोणत्या भागांमध्ये, शहरांमध्ये ही गुंतवणूक येणार आहे, याबद्दलही त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्नही विचारण्यात आले. त्यावेळी 'तुम्ही दावोसमध्ये आहात. एक करार शिंदे गटाचा मनसेसोबत झाला आहे, तर त्या कराराची माहिती तुम्हाला मिळाली आहे का?', असा प्रश्न विचारण्यात आला.
महाराष्ट्रात येईल तेव्हा...
या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मी सध्या दावोसमध्ये लक्ष्य केंद्रीत केले आहे. महाराष्ट्रात येईल, तेव्हा महाराष्ट्रातील सर्व करारांची माहिती देईन, तुम्ही काळजी करू नका."
कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपा-शिंदेसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यानंतरही मनसेला शिंदेसेनेने सोबत घेतले आहे. भाजपावर एकप्रकारे दबाव आणण्याचे प्रयत्न असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
फडणवीस परतल्यावर महापौर पदाचा होणार निर्णय?
महापालिकांच्या महापौर पदांचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गाचा महापौर बसणार, हेही स्पष्ट झाले आहे. तरीही शिंदेसेना-भाजपा युतीचा महापौर निश्चित झालेला नाही.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावरून परत आल्यानंतर महापौर पदाचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महापालिकांच्या महापौर पदासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार आहे. त्यात यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.