बुलढाण्यात शिस्तसेवकांचा ट्रॅक्टर उलटून १२ जखमी
By admin | Published: September 25, 2016 09:09 PM2016-09-25T21:09:30+5:302016-09-25T21:09:30+5:30
मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होण्याकरिता येत असलेल्या शिस्तसेवकांचा ट्रॅक्टर बोथा घाटात रविवारी दुपारी उलटल्यामुळे १२ जण जखमी झाले.
ऑनलाइन लोकमत
बुलढाणा, दि. 25 - 26 सप्टेंबर रोजी बुलडाणा येथे आयोजित मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होण्याकरिता येत असलेल्या शिस्तसेवकांचा ट्रॅक्टर बोथा घाटात रविवारी दुपारी उलटल्यामुळे १२ जण जखमी झाले. जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, तीन जणांना औरंगाबाद येथे रेफर करण्यात आले आहे.
२६ सप्टेंबर रोजी आयोजित मराठा क्रांती मोर्चात जिल्ह्यातून १० हजार शिस्तसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शिस्तसेवकांना रविवारी दुपारी ४ वाजता मोर्चाच्या आयोजनासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात सहभागी होण्याकरिता शेगाव तालुक्यातील शिस्तसेवक येत होते.
बोथा घाटात ट्रक्टर उलटल्याने राजकुमार उन्हाळे, अमोल गायकवाड, मंगेश उन्हाळे, गजानन ठाकरे, पवन उन्हाळे, आकाश उन्हाळे, विठ्ठल काळे, विठ्ठल उन्हाळे, सुधाकर उन्हाळे, गजानन ठाकरे, शुभम देशमुख, ऋषिकेश वाघमारे आदी जखमी झाले. यापैकी अमोल गायकवाड, गजानन ठाकरे व आकाश उन्हाळे यांना औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.