महाराष्ट्रात ‘शिंदे’शाही; भाजपच्या नव्या खेळीने सारेच अवाक, राजकीय नाट्यानंतर फडणवीस बनले उपमुख्यमंत्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 06:16 AM2022-07-01T06:16:18+5:302022-07-01T06:17:28+5:30
फडणवीस यांच्या घोषणेनंतर भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारत नव्या सरकारात सहभागी होण्याचे आदेश दिले.
मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर गुरुवारी भाजपने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर लगेचच राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले. मात्र, राजभवनावर झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव घोषित करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
शिंदे यांच्या गटाला भाजप पाठिंबा देईल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांच्या घोषणेनंतर भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारत नव्या सरकारात सहभागी होण्याचे आदेश दिले. या सर्व राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडल्या. अखेरीस सायंकाळी साडेसात वाजता राजभवनावरील छोटेखानी समारंभात शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
फडणवीस हे मोठ्या आणि उमद्या मनाचे राजकारणी -
फडणवीस हे मोठ्या आणि उमद्या मनाचे राजकारणी आहेत. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. महाराष्ट्रात एक मजबूत सरकार दिसेल. बाळासाहेबांचे हिंदुत्व, मतदारसंघातील कामे आणि राज्याचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. मंत्रिपदासाठी किंवा कोणत्याही स्वार्थासाठी आम्ही एकत्र आलो नाही, असे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
मविआने पायाभूत कामांना स्थगिती दिली -
अडीच वर्षात मविआने पायाभूत कामांना स्थगिती दिली. नवीन विकास योजना आणल्या नाहीत. दोन मंत्री तर भ्रष्टाचारामुळे जेलमध्ये गेले ही खेदाची बाब आहे. पण, आता आगामी काळात मेट्रो, विकासाचे प्रकल्प, ओबीसींचे राजकीय आरक्षण, मराठा आरक्षण असे अन्य सर्व विषय हे निश्चितपणे एका टप्प्यावर आणले जातील, असे राज्याचे नवे उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.