बावनकुळेंच्या त्या विधानावर शिंदेंची शिवसेना संतप्त, दिला स्पष्ट इशारा, संजय शिरसाट जागावाटपाबाबत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 12:41 PM2023-03-18T12:41:23+5:302023-03-18T12:42:20+5:30
Sanjay Shirsat Criticize Chandrashekhar Bawankule's statement: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागावाटपाबाबत केलेल्या विधानामुळे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपा यांच्यात खटके उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर अनेक धक्कादायक घडामोडी घडून राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युतीचं सरकार स्थापन झालं होतं. या सरकारबाबत महत्त्वाचा निर्णय सुप्रिम कोर्टामधून काही दिवसांतच येणार आहे. मात्र सरकार स्थापन होऊन वर्षही झालं नसताना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपा यांच्यात खटके उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपा २४० आणि शिवसेना ४८ जागा लढवेल, असं विधान केलं होतं, त्या वक्तव्यावर नंतर त्यांनी सारवासारव केली. मात्र या विधानामुळे शिवसेना संतप्त झाली असून, शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर घणाघाती टीका केली आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी बोतलाना संजय शिरसाट यांनी सांगितलं की, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यामध्ये फार काही दम नाही आहे. ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असले तरी त्यांना जागावाटपाबाबतचे अधिकार कुणी दिलेले नाहीत. अशी विधानं केल्याने युतीमध्ये बेबनाव होतो. याची जाणीव बावनकुळे यांनी ठेवली पाहिजे. केवळ ४८ जागा लढवायला आम्ही मुर्ख आहोत काय. जागावाटपाबाबत वरिष्ठ पातळीवर बैठक होईल. त्यामध्ये वरिष्ठ जो निर्णय घेतील. त्यांना तो निर्णय जाहीर करू दे. तुम्हाला मला अधिकार कुणी दिला. अशा विधानांमुळे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होते, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या या विधानाबाबत बोलताना संजय शिरसाट पुढे म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतिउत्साहातून त्यांनी हे विधान केलं आहे. त्यांना वाटतं की मी प्रदेशाध्यक्ष असल्याने माझ्या नेतृत्वात पक्षाच्या वाट्याला जास्त जागा याव्यात. यात काही वावगं नाही. मात्र अशा विधानांमुळे आपल्या मित्रपक्षांना त्रास होतो. त्यातून मग खरंच भाजपाच्या वाट्याला एवढ्या जागा गेल्या तर आपल्या वाट्याला काय येणार? असा सवाल निर्माण होतो. हे जे प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रकार झाला आहे तो चुकीचा आहे. आपल्या अधिकारात आहे तेवढंच बोललं पाहिजे. तसेच जो काही मोठा निर्णय आहे तो कुणी प्रदेशाध्यक्ष किंवा स्थानिक कमिटी घेत नाही. तर वरिष्ठ घेत असतात, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, २०२४ च्या निवडणुकीत आपल्या जागा शंभर टक्के ज्या काही १५०-१७० येतील. पण आपण २४० जागा लढवण्याच्या विचारात आहोत. कारण शिंदेच्या शिवसेनेकडे ५० जागा आहेत. त्यावरती त्यांच्याकडे कुणी नाही. २४० जागा लढल्या तर अशावेळी तुम्हाला तुमची टीम अलर्ट करावी लागेल. तुम्हाला खूप काम आहे असं विधान चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रसिद्धी प्रमुखांच्या बैठकीत केले होते. त्यावरून वाद उफाळल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा व्हिडिओ चर्चेत आल्यानंतर सर्व सोशल माध्यमातून तो हटवण्यात आला.