चमकोंची हौस पुरी; पण ‘विच्छा’ मात्र अपुरी !
By admin | Published: February 8, 2015 11:27 PM2015-02-08T23:27:58+5:302015-02-08T23:27:58+5:30
यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे,’ हे वाक्य वारंवार म्हणतो तो निवेदक (नव्हे अँकर), लोक आपली कला नव्हे, तर आपल्याला पाहायला आलेत
राजीव मुळ्ये, बेळगाव, बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी :
‘यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे,’ हे वाक्य वारंवार म्हणतो तो निवेदक (नव्हे अँकर), लोक आपली कला नव्हे, तर आपल्याला पाहायला आलेत, याचं पक्कं भान ज्यांना आहे ते कलावंत (नव्हे सेलिब्रिटी) आणि या दोहोंची गोळाबेरीज म्हणजे ‘इव्हेंट’! या रूढ व्याख्यांचा जेव्हा अस्सल कलेला तडाखा बसतो, तेव्हा ‘हौस’ पुरी होते; पण ‘विच्छा’ अपुरीच राहते!
नाट्य संमेलनाच्या मुख्य मंडपात शनिवारी रात्री असाच प्रकार पाहायला मिळाला. ‘इव्हेंट’ नावाचा सेलिब्रिटींचा उत्सव वाढता वाढे या न्यायाने लांबतच राहिला आणि त्यानंतर सुरू झालेला ‘विच्छा माझी पुरी करा’ या भन्नाट वगनाट्याचा रंगत चाललेला प्रयोग वेळ संपल्याने मध्येच थांबवावा लागला. अचूक ‘टायमिंग’ हे बलस्थान असलेले अभिनेते विजय कदम यांना सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या ‘टायमिंग’चा फटका सहन करावा लागला. ‘विच्छा’चा प्रयोग अपूर्ण राहिल्यामुळं अस्सल नाट्यप्रेमी हळहळतच मंडपाबाहेर पडले.
केवळ ‘एक्साइटमेंट’ देणाऱ्या ‘इव्हेंट’ या प्रकाराची क्रेझ आता केवळ मुंबईपुरती नव्हे, तर लहान-मोठ्या शहरांतही पसरली आहे. बेळगावकरांनाही या ‘क्रेझ’नं झपाटलं असणारच, असा होरा ठेवून ‘ज्येष्ठ सेलिब्रिटीं’ची एक रजनी शनिवारी झाली होती. मुख्यमंत्री सकाळी न येता संध्याकाळी आल्यामुळं ही रजनी सुरू व्हायला उशीर झाला. त्यानंतर ‘विच्छा’चा प्रयोग होता. सर्वोच्च न्यायालयाने वेळेसंदर्भात घातलेले निर्बंध आयोजकांना माहीतच नाहीत, हे शक्य नाही. त्यामुळं ‘इव्हेंट’ची हौस आवरती घेऊन रंगमंच विजय कदमांच्या हाती सोपवला जाणं आवश्यक होतं. मात्र, घडलं भलतंच!
तरुण सेलिब्रिटींनी तर बेळगाव संमेलनाकडे पाठ फिरवलीच आहे; त्यामुळं जे सेलिब्रिटी हजर आहेत, त्यांनाच आग्रह करकरून गाणं म्हणायला भाग पाडण्यात आलं. पाच-सहा कलावंतांचा आॅर्केस्ट्रा दिमतीला होताच. ज्यांना गाणं अजिबातच येत नाही, त्यांनी कविता वगैरे (अर्थातच दुसऱ्यांनी लिहिलेल्या) म्हणून दाखवल्या. ज्यांना ‘स्केल’ सांभाळता येत नाही अशांनी गाणी म्हटली. कोणे एकेकाळी नृत्यांगना असलेल्यांनी नृत्यं सादर केली. मधून-मधून पातळ विनोदांची फोडणी दिली गेली. उत्सुकता ताणण्याचा अभिनय करणाऱ्या स्त्री-पुरुष निवेदकांनी बोलून-बोलून काव आणला. पुन्हा प्रत्येक परफॉर्मरचा सत्कार! तोही एखाद्या सेलिब्रिटीच्या हस्ते! म्हणजे, ‘आता मी स्टेजवर आमंत्रित करतो....’ हे वाक्यही पुन:पुन्हा ऐकायचं. सेलिब्रिटींचं ‘दर्शन’ घ्यायचं आणि (अँकरनं सांगितल्यावर) टाळ्या वाजवायच्या, एवढंच रसिकांच्या हाती उरलं. कारकिर्दीचा विशिष्ट मुक्काम गाठलेल्या सेलिब्रिटींनीच सादरीकरण केलं, ही बाब दखल घेण्याजोगी आहे. ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांनी सादर केलेला ‘एकच प्याला’मधला सुंदर प्रवेश हीच या रजनीची एकमेव उजवी बाजू ठरली. त्यानंतर वगसम्राट विजय कदम यांच्याकडे रंगमंचाचा ताबा आला. ढोलकीच्या भन्नाट तुकड्याने वातावरण गरम केलं. फक्कड बतावणीतून गोष्ट सुरू झाली. प्रधान, कोतवाल, हवालदार, त्याची प्रेयसी अशी सगळीच पात्रं जीव ओतून नाटकात रंग भरू लागली... आणि... अचानक विजय कदम हात जोडून उभे राहिले. ‘न्यायालयाच्या आदेशानुसार इथंच थांबावं लागतंय. माफ करा,’ असं ते म्हणाले व सन्नाटा पसरला.