शिंगणापूर चौथारा वाद ; तृप्ती देसार्इंना पोलिसांनी दोनदा अडविले
By admin | Published: February 22, 2016 06:42 PM2016-02-22T18:42:22+5:302016-02-22T18:42:22+5:30
शिंगणापूर ग्रामस्थ व देवस्थान ट्रस्टसोबत चर्चा करण्यासाठी शिंगणापूरला निघालेल्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना आज (सोमवारी) पोलिसांनी नगर शहराजवळ केडगाव येथे अटकाव केला.
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. २२ - शिंगणापूर ग्रामस्थ व देवस्थान ट्रस्टसोबत चर्चा करण्यासाठी शिंगणापूरला निघालेल्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना आज (सोमवारी) पोलिसांनी नगर शहराजवळ केडगाव येथे अटकाव केला. कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे तुम्हाला शिंगणापूरला जाता येणार नाही, अशी नोटीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी त्यांना बजावली आहे.
पोलिसांनी देसार्इंसह माधुरी शिंदे, मीना राजू भटकर, मनिषा टिळेकर, शैनाज शेख या कार्यकर्त्यांना पोलीस मुख्यालयात थांबवून पुन्हा पुण्याकडे परतण्यास सांगितले. मात्र, नोटीस बजावल्यानंतरही देसाई व त्यांच्यासमवेतचे कार्यकर्ते नगरमधून शिंगणापूरकडे निघाल्याने औरंगाबाद रस्त्यावर त्यांना पुन्हा अडविण्यात आले.
आपण शिंगणापुरात जाऊनच ग्रामस्थांशी चर्चा करणार, अशी हटवादी भूमिका देसाई यांनी घेतली आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पुण्याच्या दिशेने नेले आहे. शनिशिंगणापूरचे विश्वस्तही चर्चा न करताच गावी परतले
यापुढे न सांगताच शिंगणापुरात प्रवेश करू, असा इशारा देसाई यांनी दिला आहे. आपल्या पहिल्या आंदोलनाला महिना उलटल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी आमच्यासोबत चर्चा केलेली नाही, असे नमूद करत देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारचा निषेध केला आहे.