शिराळा नगरपंचायत राष्ट्रवादीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2017 02:54 AM2017-05-27T02:54:38+5:302017-05-27T02:54:38+5:30
नागपंचमीदिवशी जिवंत नागाची पूजा केली जात असल्याने जगभरात प्रसिद्ध झालेल्या बस्तास शिराळा नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपला झटका देत
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा (जि. सांगली) : नागपंचमीदिवशी जिवंत नागाची पूजा केली जात असल्याने जगभरात प्रसिद्ध झालेल्या बस्तास शिराळा नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपला झटका देत राष्ट्रवादीने सत्ता मिळवली. १७ पैकी ११ जागा जिंकत राष्ट्रवादीने बाजी मारली असून, भाजपला ६ जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.
नागपंचमीदिवशी जिवंत नागपूजेस परवानगी मिळावी, या मागणीसाठी सप्टेंबरमध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर ग्रामस्थांनी व सर्वच पक्षांनी बहिष्कार घातला होता. मात्र, ३१ डिसेंबर रोजी झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर बहिष्काराची तीव्रता कमी होत गेली.
दोडामार्गमध्ये काँग्रेसचा झेंडा
दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) : कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीत सेनेच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने झेंडा फडकाविला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार अदिती अजय मणेरीकर यांनी शिवसेनेच्या फुलराणी ज्ञानेश्वर गावकर यांचा उच्चांकी ७४ मतांनी पराभव करीत विजयश्री संपादन केली. मणेरीकर यांना एकूण ११२, तर गावकर यांना केवळ ३८ मते मिळाली.
चिपळूणमध्ये शिवसेना
चिपळूण (जि. रत्नागिरी) : शहरातील प्रभाग क्र. ९ अ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने सत्ताधारी भाजपला धक्का देत विजय मिळविला. शिवसेनेच्या सुरैया महंमद फकीर यांनी भाजपच्या नेहा अजय भालेकर यांचा ७६ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ममता नेवरेकर यांना केवळ १६९ मतांवर समाधान मानावे लागले.