शिरसोली बारी पंच मंडळाचा उपक्रम : शोभायात्रेत कलशधारी महिलांचा सहभाग
By admin | Published: August 7, 2016 10:10 PM2016-08-07T22:10:03+5:302016-08-07T22:10:03+5:30
नागपंचमीनिमित्त नागराजाला लाह्यांचा नैवेद्य व दूध अर्पण करण्यात येते.
विलास बारी
जळगाव : नागपंचमीनिमित्त नागराजाला लाह्यांचा नैवेद्य व दूध अर्पण करण्यात येते. मात्र प्राचीन काळापासून ‘नागवेली’चे सेवक असलेल्या बारी समाजबांधवांकडून नागपंचमीच्या निमित्ताने शोभायात्रा काढून शेतात विधीवत पूजा करण्यात आली.
जळगाव जिल्ह्यातील शिरसोली, पहूर, शेंदुर्णी, पिंप्राळा, हरि विठ्ठल नगर, अमळनेर, चोपडा, यावल या ठिकाणी बारी समाजाचे वास्तव्य आहे. नागवेलीची (विळ्याचे पाने) शेती करणे या समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे. समुद्रमंथनातून नागवेलीचे रोप बाहेर आल्यापासून बारी समाजबांधव या नागवेलीची सेवा करीत असल्याची आख्यायिका आहे. उत्तर महाराष्ट्रासोबत विदर्भ, मराठवाडा, पुणे, उत्तरप्रदेश भागात बारी समाजबांधवांचे वास्तव्य आहे.
नागपंचमीला नागवेलीचे पूजन
पिढीजात व्यवसाय असलेल्या नागवेलीची शेती करणारा बारी समाजबांधव हा नागपंचमीला गावागावातून नागवेलीचे पूजन करीत असतो. जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील बारी पंच मंडळातर्फे शोभा यात्रा काढण्यात आली. कलशधारी सौभाग्यवती महिला या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. गावाशेजारी असलेल्या विठ्ठल नागपुरे यांच्या शेतात समाजाचे अध्यक्ष रंगराव बारी यांच्या हस्ते नागवेलीची विधीवत पूजा करण्यात आली.
नागपंचमीला पाळली जातात ही पथ्ये
नागपंचमीच्या दिवशी बारी समाजबांधवांकडून स्वयंपाकघरात पोळ्या करण्यासाठी तव्याचा वापर केला जात नाही. तसेच भाजी चिरली जात नाही. एकही समाजबांधव शेतात कामाला जात नाही. शेतात खोदकाम केले जात नाही. नागवेलीची पूजा करून विश्वशांतीसाठी आणि सर्वांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना केली जाते. बारी पंच मंडळातर्फे पूर्वी गावातील प्रत्येक घरात गुळाचे वाटप करण्यात येत होते.
समाजप्रबोधनपर वह्यांचा कार्यक्रम
नागपंचमीच्या दिवशी काढण्यात येत असलेल्या शोभायात्रेत समाजातील नागरिक हे जुनी लोकगीते सादर करतात. यात कुटुंबनियोजन, गरीबी, मजुरांची होणारी दैना, हगणदरीमुक्त गाव, शासकीय अनास्था यासाऱ्यावर प्रकाश टाकण्यात येत असतो.