साईंच्य्या काकड आरतीच्या वेळेत बदल; १ मार्चपासून बदल अंमलात येणार, जाणून घ्या नव्या वेळा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 08:10 PM2022-02-22T20:10:26+5:302022-02-22T20:13:55+5:30
शेजारतीची वेळ रात्री १० वाजता; संस्थानच्या सीईओंनी दिली माहिती
शिर्डी : साईंच्या काकड आरतीची वेळ पाऊण तास उशिराने व शेजारतीची वेळ अर्धा तास आधी घेण्याचा निर्णय साईसंस्थान व्यवस्थापनाने घेतला आहे. या नवीन बदलामुळे काकड आरती सकाळी सव्वा पाच वाजता तर शेजारती रात्री १० वाजता होईल. यामुळे दिवसभरात दर्शनाची वेळ सव्वा तासाने कमी होणार आहे. १ मार्चपासून (महाशिवरात्री) हे नवीन बदल अंमलात येणार आहेत, अशी माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
दर्शनाची वेळ वाढवून गर्दी व्यवस्थापनासाठी तत्कालीन अध्यक्ष स्व. जयंत ससाणे यांच्या अध्यक्षतेखालील व्यवस्थापनाने ६ एप्रिल २००८ रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काकड आरती पाऊण तास आधी पहाटे साडे चार वाजता, तर शेजारती अर्धा तास उशिराने रात्री साडे दहा वाजता घेण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे दिवसभरातील दर्शनाची वेळ सव्वा तासाने वाढली होती. अनेक भाविक रात्री शेजारतीनंतर जेवतात, आरती होईपर्यंत हॉटेल व प्रसादालय बंद झालेले असते. त्यामुळे भाविकांची गैरसोय होते. याशिवाय काकड आरतीला खूपच लवकर तीन-साडे तीन वाजताच मंदिरात जावे लागते. यामुळे सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर आरत्यांची वेळ पूर्ववत करावी, अशी मागणी भाविक व ग्रामस्थांकडून झाली होती. या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखालील व्यवस्थापनाने आरतीच्या वेळा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. भाविक व ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
जमावबंदी शिथिल व्हावी
दर्शनाची वेळ कमी झाल्याने भाविकांना दर्शनासाठी घाई करू नये. त्यांना काच काढून समाधीला हस्तस्पर्श करून दर्शनाचा आनंद घेऊ द्यावा, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे. सध्या कोविडमुळे रात्रीची जमावबंदी आदेश असल्याने सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंतच मंदिराची वेळ आहे. यामुळे काकड आरतीला व शेजारतीला भाविकांना उपस्थित राहता येत नाही. ही जमावबंदी लवकरात लवकर उठवावी व गुरुवारची शेजारती सुरू करावी, अशीही मागणी भाविकांमधून होत आहे.