शिर्डीत बाळासाहेब थोरातांच्या कन्या देणार राधाकृष्ण विखेंना आव्हान ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 03:43 PM2019-09-16T15:43:42+5:302019-09-16T15:45:37+5:30
प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून थोरातांनी शिर्डी मतदार संघातील गाठीभेटी वाढवल्या असून कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यावर भर दिल्याचे पाहायला मिळाले आहे.
मुंबई - अहमदनगर जिल्ह्यातून काँग्रेसला हद्दपार करण्यासाठी रणनिती आखत असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का देण्यासाठी काँग्रेसकडून देखील योजना करण्यात येत आहे. संगमनेर मतदार संघात थोरातांविरुद्ध राधाकृष्ण विखे पाटलांच्या पत्नी शालिनी विखे यांना उमेदवारी देण्याचा मतप्रवाह भाजपमध्ये असताना शिर्डीतून विखे पाटलांना रोखण्यासाठी थोरातांच्या कन्येचे नाव समोर करण्यात आले आहे.
गृहनिर्माण राज्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना रोखण्यासाठी शिर्डीत काँग्रेसकडे तगड्या उमेदवाराची कमतरता आहे. अशा स्थितीत बाळासाहेब थोरात यांच्या कन्या शरयू रणजितसिंह देशमुख यांचे नाव कार्यकर्त्यांकडून समोर करण्यात आले आहे. शिर्डी मतदार संघात संगमनेरमधील २८ गावांचा समावेश आहे. त्यातील आश्वी आणि जोर्वे या दोन जिल्हापरिषद गटात देशमुखांचे प्राबल्य आहे. त्यामुळे शिर्डी मतदार संघातून धक्कादायक निकाल लागू शकतो, असं मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून काँग्रेसला धक्का देण्यासाठी विखे कुटुंबीय प्रयत्नशील आहे. परंतु, आता काँग्रेसकडून देखील देखील विखे पाटलांना शह देण्यासाठी योजना करण्यात आली आहे. यावर पर्याय म्हणून थोरातांनी देखील शिर्डीवर लक्ष केंद्रीत केले आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून थोरातांनी शिर्डी मतदार संघातील गाठीभेटी वाढवल्या असून कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यावर भर दिल्याचे पाहायला मिळाले आहे.