शिर्डीत शिवसेनेच्या दोन गटांत हाणामारी

By admin | Published: May 24, 2015 01:52 AM2015-05-24T01:52:37+5:302015-05-24T01:52:37+5:30

संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत दोन गटांत जबर हाणामारी झाली़ त्यामुळे पक्षातील गटबाजी समोर आली़

In Shirdi, two factions of Shivsena clashed | शिर्डीत शिवसेनेच्या दोन गटांत हाणामारी

शिर्डीत शिवसेनेच्या दोन गटांत हाणामारी

Next

शिर्डी : संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत दोन गटांत जबर हाणामारी झाली़ त्यामुळे पक्षातील गटबाजी समोर आली़ पोलिसांनी बळाचा वापर करीत कार्यकर्ते विश्रामगृहाबाहेर काढले़ दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या आहेत.
जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी शनिवारी जिल्ह्यातील उत्तर भागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची शिर्डी विश्रामगृहात बैठक घेतली़ जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे व अन्य तालुक्यांचे पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते़ दुपारी तीनच्या सुमारास संस्थानच्या प्रसादालयाबाहेरच शिर्डी शहरप्रमुख सचिन कोते, गणेश सोमवंशी यांचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिनेश शिंदे यांच्याशी वाद झाले़
हे दोन्ही गट विश्रामगृहावर आल्यानंतर त्यांना शिंदे, खेवरे व अभय शेळके समजावत होते़ त्याचवेळी शिर्डीतील दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली़ वाद विकोपाला जाऊ नये, म्हणून पोलिसांनी त्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बंद केले़
कोपरगावची बैठक सुरू असताना कैलास जाधव, राजेंद्र झावरे, भरत मोरे, सागर जाधव व बाळासाहेब जाधव, आदिनाथ ढाकणे यांच्या गटात हाणामारी झाली़ त्यात बाळासाहेब जाधव जखमी झाले़
पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी बळाचा वापर करीत कार्यकर्ते विश्रामगृहाबाहेर काढले़ बाळासाहेब जाधव यांनी कैलास जाधव, राजेंद्र झावरे, भरत मोरे व सागर जाधव यांच्या विरोधात तक्रार दिली़
सचिन कोते यांनी बाहेरील गुंड आणून दिनेश शिंदे यांना अडवून त्यांना कट्टा दाखवत राजेंद्र पठारे व संजय शिंदे यांचा गेम करायचा आहे, असे सांगितले़ सचिन कोते यांचा हा पूर्वनियोजित कट होता़ आमच्या जीविताला धोका असल्याने आम्ही त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, असे राजेंद्र पठारे यांनी सांगितले. तर राजेंद्र पठारे यांचे पक्षात अस्तित्व उरलेले नाही. त्यांनी बाहेरून लोक आणून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप सचिन कोते यांनी केला. (प्रतिनिधी)

कोपरगावात तणाव
शिवसेनेतील राड्यानंतर कोपरगावात तणाव निर्माण झाला़ सेनेतील कार्यकर्त्यांचा मोठा जमाव कोपरगाव बसस्थानकासमोर सायंकाळी सातच्या सुमारास आला़ बस स्थानक परिसर हा माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांचा बालेकिल्ला मानला जातो़ तेथे कार्यकर्त्यांनी झावरे, कैलास जाधव व भरत मोरे यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली़ पोलिसांनी जमावाला पांगविले़

संघटनात्मक बाबींवर बैठक सुरू असताना बाहेर दोन गटांत वाद झाले़ त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही़ आमची बैठक सुरळीत झाली. कार्यकर्त्यांतील मतभेद चर्चेने दूर करू़
- आ़ सुनील शिंदे,
उत्तर जिल्हाप्रमुख

Web Title: In Shirdi, two factions of Shivsena clashed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.