शिर्डीत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार
By admin | Published: July 3, 2017 04:39 AM2017-07-03T04:39:00+5:302017-07-03T04:39:00+5:30
साईसमाधी शताब्दी सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला असताना सरकार व संस्थान पुरेशी विकासकामे करण्यात अपयशी ठरले
लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्डी : साईसमाधी शताब्दी सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला असताना सरकार व संस्थान पुरेशी विकासकामे करण्यात अपयशी ठरले आहे़ शताब्दीसाठी निधी देण्याऐवजी केवळ प्रस्तावाला मान्यता दिली़ त्याचा निषेध करण्यासाठी ८ जुलैला शिर्डी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून शिर्डी बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला़
साई संस्थानला वेळोवळी निवेदने देऊन, प्रत्यक्ष भेटून तसेच भावनांची तीव्रता निदर्शनास आणून देण्यासाठी आंदोलन करूनही संस्थान सुस्त आहे़ त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी ग्रामसभा घेतली. शताब्दी व शहरविकासाची कामे तातडीने सुरू करावी व आठ दिवसांत संस्थान अध्यक्षांनी ग्रामस्थांशी चर्चा करावी. अन्यथा विश्वस्त मंडळास शिर्डीत पाय ठेवू देणार देणार नाही, असा इशारा माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी दिला.
डॉ. एकनाथ गोंदकर यांनी संस्थान व ग्रामस्थांत संवाद राहिला नसल्याचे सांगत कोणतेही काम सुरू नसल्याचा आरोप केला. आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले़ व्यवस्थापन व प्रशासन एकमेकांवर अपयशाचे खापर फोडत असल्याचे सांगण्यात येते.