"रंजक लेखनशैलीचा बादशाह हरपला"; शिरीष कणेकरांना मुनगंटीवारांनी वाहिली आदरांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 09:11 PM2023-07-25T21:11:39+5:302023-07-25T21:12:00+5:30
वयाच्या ८०व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Shirish Kanekar passes away: खुमासदार शैलीच्या लेखनाने मराठी पत्रकारिता आणि साहित्यक्षेत्रात भरीव योगदान देणारे प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक शिरीष कणेकर यांचे आज मुंबईत निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. आज सकाळी प्रकृती खालावल्यामुळे शिरीष कणेकर यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केले होते. याच दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. शिरीष कणेकर यांच्या निधनाने रंजक लेखनशैलीचा बादशाह हरपला आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिरीष कणेकर यांना श्रद्धांजली वाहिली.
"क्रिकेट आणि सिनेमा हे शिरीष कणेकर यांचे अत्यंत आवडीचे विषय होते. आयुष्यातील कुठलेही अनुभव क्रिकेट आणि सिनेमाशी रंजक पद्धतीने जोडण्याची त्यांची हातोटी होती. क्रिकेटपटू आणि सिनेकलाकार यांच्याशी असलेली त्यांची कलासक्त मैत्री आणि त्यातून त्यांनी उभी केलेली व्यक्तिचित्रे वाचकांवर एक वेगळा प्रभाव निर्माण करून गेली. त्यातही स्व. लतादिदी, स्व.देव आनंदजी, श्री सुनीलजी गावसकर ही त्यांची दैवते होती. त्यांच्या रंजक किस्स्यांच्या खजिन्यामुळे मराठी वाचकविश्वात त्यांनी स्वतःचा स्वतंत्र वाचकवर्ग निर्माण केला. त्यांच्या काळातील ते एक सिद्धहस्त विनोदी लेखक म्हणून नावाजले. त्यांची कथाकथनेही तुफान म्हणावी अशी होती जी रसिकांच्या कायम लक्षात राहतील. त्यांचे क्रिकेटपटू आणि सिनेकलाकारांवरील एकपात्री कार्यक्रमही अनोखे होते," असे म्हणत त्यांनी आठवणीना उजाळा दिला.
"शिरीषजी कणेकर यांच्या आत्म्यास सद्गती लाभो. मी त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली." अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी शिरिष कणेकर यांच्या निधनानंतर भावना व्यक्त केल्या.