शिरूर तालुक्यात काँग्रेस एकीला सुरूंग

By Admin | Published: October 31, 2016 01:18 AM2016-10-31T01:18:44+5:302016-10-31T01:18:44+5:30

काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाची निवड करताना विश्वासात घेतले नाही.

In the Shirur taluka of the Congress Ekilila darang | शिरूर तालुक्यात काँग्रेस एकीला सुरूंग

शिरूर तालुक्यात काँग्रेस एकीला सुरूंग

googlenewsNext


शिरूर : काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाची निवड करताना विश्वासात घेतले नाही. तसेच निष्ठावान, सक्षम कार्यकर्ते सोडून नातेसंबंध जोपासत आपल्याजवळच्या व्यक्तीला जिल्हाध्यक्षांनी अध्यक्षपद बहाल केले, असा आरोप करीत तालुक्यातील ज्येष्ठ व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी आज पदाचे व सदस्यत्वाचे राजीनामे दिले. जिल्हा युवकचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनीही या कारणास्तव राजीनामा दिला आहे.
आज पत्रकार परिषदेत जिल्हा युवकचे अध्यक्ष कंद, तालुकाध्यक्ष विजेंद्र गद्रे व ज्येष्ठ नेते सुरेश थोरात यांनी राजीनाम्याची माहिती दिली. जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्याकडे राजीनामे पाठविण्यात आले असून याबाबत ज्येष्ठ नेत्यांकडेही राजीनामे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्हाध्यक्ष जगताप यांनी तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी नुकतीच सणसवाडी येथील वैैभव यादव यांची नियुक्ती केली. या नियुक्तीवर नाराज झालेल्या तालुक्यातील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी आज राजीनामे दिले. याबाबत कंद म्हणाले, ‘‘तालुकाध्यक्ष निवडीबाबत विश्वासात घेतले जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र या निवडीबाबत तालुक्यातील कोणालाही विश्वासात घेण्यात आले नाही.’’ थोरात म्हणाले, ‘‘तालुक्याची कसलीही माहिती नसलेल्या, राजकीय गोष्टींची पार्श्वभूमी नसणाऱ्या, तसेच पक्षाला फारसा परिचित नसलेल्या व्यक्तीला तालुका काँग्रेसचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले. ही निवड पूर्णपणे चुकीची असून तालुक्यात गेली ३० ते ३५ वर्षे प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेस जिवंत ठेवणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून ही निवड करण्यात आली आहे.’’ गद्रे म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीच्या शिफारशीवर जगताप यांनी यादव यांची निवड केली आहे. काँग्रेसच्या एकाही सदस्याने अथवा नेत्याने त्यांची शिफारस केलेली नाही. जगताप यांचा मनमानी पद्धतीने तालुकाध्यक्षाची निवड केली असल्याचा सर्वांनी आरोप केला.’’ यादव यांची निवड रद्द करून तालुक्यातील ज्येष्ठ, निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन योग्य व्यक्तीची निवड करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
कंद यांच्यासह तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अ‍ॅड़ दिलीप करंजुळे, युवक तालुकाध्यक्ष (शिरूर-हवेली) विजेंद्र गद्रे, सेवादलाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब फडतरे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा शोभाताई वाघचौरे, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुरेश थोरात, युवकचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र मांढरे, माजी शहराध्यक्ष रुपेश गंगावणे, तालुका उपाध्यक्ष महेश जगदाळे, युवक शहराध्यक्ष अमजद पठाण, नवनाथ सासवडे, भाऊसाहेब साकोरे, अनिल सातव, चंद्रकांत सकट, सतीश वाबळे, शशिकला सातपुते, बापू ओव्हाळ आदींनी आपल्या पदाचे व काँग्रेस सदस्यत्वाचे राजीनामे दिले.
>काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक महेंद्र मल्लाव यांची २ महिन्यांपूर्वी शहरात निर्घृण हत्या झाली. १५ दिवसांपूर्वी काँग्रेसचे शहराध्यक्ष केशरसिंग परदेशी यांचे निधन झाले. मात्र पक्षाच्या या निष्ठावंतांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन करण्याचे मोठेपण संजय जगताप यांना दाखवता आले नाही. ज्येष्ठ नेत्यांबद्दल अशी भावना असेल तर कार्यकर्त्यांबद्दल त्यांना काय आदर असणार, असा संतप्त सवालही पत्रकार परिषदेत करण्यात आला.

Web Title: In the Shirur taluka of the Congress Ekilila darang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.