२५० वाहनांचा ताफा घेऊन 'ते' 'मातोश्री'वर पोहोचले, उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधले; कोण आहे 'हा' नेता?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 04:00 PM2023-08-21T16:00:33+5:302023-08-21T16:15:45+5:30
मी उद्धव ठाकरेंना शब्द देतो की, आगामी निवडणुकीत पेणचा आमदार आपलाच असणार आहे असं ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांनी म्हटलं.
मुंबई – रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील शिशिर धारकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. धारकर हे पेणचे माजी नगराध्यक्ष होते. धारकर यांच्या पक्षप्रवेशाने पेणचा पुढील आमदार आमचाच असणार असा विश्वास ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांनी व्यक्त केला आहे. शिशिर धारकर यांनी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. परंतु धारकर यांच्या पक्षप्रवेशाने अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.
२५० वाहनांचा ताफा घेऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिशिर धारकर यांनी शिवबंधन बांधून थाटामाटात प्रवेश केला. यावेळी अनंत गीते म्हणाले की, आज मोठ्या संख्येने पेणवरून कार्यकर्ते मुंबईत आलेत. शिशिर धारकर यांचा पक्षप्रवेश पेणच्या राजकारणाला कलाटणी देणारा आहे. मी उद्धव ठाकरेंना शब्द देतो की, आगामी निवडणुकीत पेणचा आमदार आपलाच असणार आहे असं त्यांनी म्हटलं. तर तुम्ही सगळे आता शिवसैनिक झालात. तुमचं स्वागत मनापासून करतो. तुम्ही लढवय्यांच्या सेनेत प्रवेश केला आहे. काही जणांचे नाव मोठे होते, पण डोळे वटारल्यावर पळून गेले. अन्याय सहन करायचा नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
त्याचसोबत शिशिर धारकर यांना सोपा मार्ग होता, वॉशिंग मशिनमध्ये तुम्हीही जाऊ शकला असता. पण तुम्ही त्यातले नाहीत. कर नाही त्याला डर कशाला? वॉशिंग मशिनमध्ये जाण्याऐवजी तुम्ही लढवय्यांच्या सेनेत आलात. सगळे शिवसैनिक तुमच्यासोबत आहेत. फक्त पेणच नव्हे तर चांदा ते बांदा आपल्याला सत्ताबदल करायचा आहे. आपल्याला शहाणपणाची सत्ता आणायची आहे. सध्या लोकांना मुर्ख बनवण्याचे काम सुरू आहे. परंतु ते जास्त काळ चालणार नाही. आता मी बोलायचे थांबतो, जे काही बोलायचे ते पेणला येऊन जाहीर सभेतच बोलेन अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि शिंदे गटावर निशाणा साधला.
पेण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर, मिहीर धारकर, माजी नगरसेवक समीर म्हात्रे ह्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत आज शिवसेनेत प्रवेश केला. ह्यावेळी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. pic.twitter.com/MTFv0fbbBd
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) August 21, 2023
कोण आहेत शिशीर धारकर?
एकेकाळी पेण नगरपालिकेवर धारकर घराण्याचे वर्चस्व होते, परंतु पेण अर्बन बँकेच्या घोटाळ्यामुळे या वर्चस्वाला धक्का बसला. शिशिर धारकर हे पेणचे माजी नगराध्यक्ष आहेत. त्याचसोबत पेण अर्बन बँक घोटाळ्यातील ते आरोपी होते. ५०० कोटीहून अधिक घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पेण अर्बन बँकेत अनेक स्थानिक लोकांचा पैसा होता. हा पैसा बँक घोटाळ्यात बुडला. त्यामुळे लोकांमध्ये संतप्त भावना आहे. गेल्या काही वर्षापासून शिशिर धारकर सक्रीय राजकारणापासून दूर होते. आता शिशिर धारकर यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने त्याचा किती फायदा ठाकरे गटाला होतो हे पाहणे गरजेचे आहे.