भेसळयुक्त दूधविक्री प्रकरणी भंडाराचे माजी खासदार शिशुपाल पटलेंसह पाच जणांना शिक्षा
By admin | Published: August 26, 2016 07:28 PM2016-08-26T19:28:47+5:302016-08-26T19:28:47+5:30
भेसळयुक्त दूधाचे उत्पादन व विक्री केल्याप्रकरणी भंडाराचे माजी खासदार शिशुपाल पटले व त्यांच्या पत्नीसह पाच आरोपींना एक वर्षाचा सश्रम करावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
Next
>ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 26 - भेसळयुक्त दूधाचे उत्पादन व विक्री केल्याप्रकरणी भंडाराचे माजी खासदार शिशुपाल पटले व त्यांच्या पत्नीसह पाच आरोपींना एक वर्षाचा सश्रम करावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आणखी एका महिना साध्या कारावासाचे प्रावधान आहे. हा निकाल येथील मुख्य न्यायदंडाधिकारी एस.एन. माने-गाडेकर यांनी खुल्या न्यायालयात शुक्रवारी सुनावला.
अन्न भेसळ प्रतिबंधित कायदा १९५४ अंतर्गत तत्कालीन अन्न निरीक्षक सं.भा. नारागुडे यांनी वर्धेतील मे. राजेंद्र दूध डेअरी या पेढीस अचानक भेट दिली. दरम्यान राजेंद्र भुराजी अवथळे याच्याकडून मे. पवन मिल्क अॅन्ड फुड प्रोडक्टस, तुमसर रोड, भंडारा यांच्याद्वारा उत्पादित ‘केशर गाय का
दूध’ या अन्नपदार्थाचा नमुना दि. ०२ आॅक्टोबर २००८ रोजी भेसळीच्या संशयावरून विश्लेषणाकरिता घेण्यात आला होता. सदर नमुना विश्लेषणाअंती कायद्याने ठरवून दिलेल्या गाईच्या दूधाच्या मानदापेक्षा कमी मानदाचे
अर्थात अप्रमाणित घोषित झाला होता. या आधारे सदर प्रकरणाचा संपूर्ण तपास
व चौकशी तत्कालीन अन्न निरीक्षकाने करून प्रकरण जानेवारी २००९ मध्ये येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात न्यायप्रविष्ट केले
होते. सदर प्रकरणी भेसळयुक्त दूधाची विक्री केल्याप्रकरणी वर्धेतील मे. राजेंद्र दूध डेअरीचे राजेंद्र भुराजी अवथळे याला आरोपी करण्यात आले
होते. तसेच सदर दूधाचे उत्पादक मे. पवन मिल्क अॅन्ड फुड प्रोडक्टस, एस.आय.डी.सी. तुमसर रोड, ता. तुमसर, जि. भंडारा हे असल्यामुळे सदर पेढीचे सर्व मालक व भागीदार शिशुपाल नत्थूजी पटले, दूर्गाप्रसाद शंकरलाल पटले,
सुमन दूर्गादास पटले, शिल्पा शिशुपाल पटले यांना भेसळयुक्त दुधाची उत्पादन व विक्रीप्रकरणी आरोपी करण्यात आले होते.
याप्रकरणी साक्ष पुरावे नोंदविण्यात आले होते. आरोपी व शासनाच्यावतीने युक्तिवाद करण्यात आला. यात उपरोक्त आरोपींनी भेसळयुक्त दूधाचे उत्पादन व विक्री केल्याचे निष्पन्न झाले. जनहित व जनआरोग्याचा विचार तसेच अशा प्रवृत्तीला आळा घालण्याच्या दृष्टीने मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एन.
माने-गाडेकर यांनी आरोपी राजेंद्र भुराजी अवथळे याला भेसळयुक्त दुधाची विक्रीप्रकरणी सहा महिने सश्रम करावासाची शिक्षा व एक हजार रूपयांचा दंड आणि दंड न भरल्यास आणखी एक महिना साध्या करावासाची शिक्षा ठोठावली. सदर दूधाचे उत्पादक आरोपी सर्व मालक व भागीदार शिशुपाल नत्थूजी पटले, दुर्गाप्रसाद शंकरालाल पटले, सुमन दुर्गाप्रसाद पटले व शिल्पा शिशुपाल पटले यांना भेसळयुक्त दूधाचे उत्पादन व विक्री केल्याप्रकरणी प्रत्येकी
एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा आणि प्रत्येकी एक हजार रूपयांचा दंड आणि दंड न भरल्यास, प्रत्येकी एक महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
शासनाच्या वतीने सहायक सरकारी अभियोक्ता एस.डी. स्थुल यांनी युक्तिवाद केला. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे कार्यरत अन्न सुरक्षा अधिकारी रवीराज धाबर्डे यांच्यामार्फत योग्य पाठपुरावा करण्यात आला. सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) ज.रा. वाणे यांचे
मार्गदर्शनाखाली करण्यात आली. भेसळयुक्त दूधाचे उत्पादन, साठवणूक व
विक्री होत असल्याचे आढळल्यास यापुढेही अशीच कठोर कारवाई करण्यात येईल,
असे आवाहन नागपूर विभागाचे सह आयुक्त (अन्न) केकरे यांनी केले आहे.