शिवछत्रपतींच्या भवानी तलवारीचे उद्या साताऱ्यात होणार शाही पूजन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 01:45 PM2017-09-29T13:45:25+5:302017-09-29T13:46:41+5:30

साताऱ्यात शनिवारी ऐतिहासिक 'शाही दसरा सोहळा' उत्साहात साजरा होणार आहे.  शिवछत्रपती घराण्याची भवानी तलवार फुलांनी सजवलेल्या पारंपरिक लाकडी पालखीत ठेवून मिरवणुकीने पोवई नाका येथील पूजनाच्या ठिकाणापर्यंत आणण्यात येईल.

Shiv Chhatrapati Bhavanani sword will be held in Satara tomorrow, Shahi Poojan | शिवछत्रपतींच्या भवानी तलवारीचे उद्या साताऱ्यात होणार शाही पूजन

शिवछत्रपतींच्या भवानी तलवारीचे उद्या साताऱ्यात होणार शाही पूजन

ठळक मुद्दे साताऱ्यात शनिवारी ऐतिहासिक 'शाही दसरा सोहळा' उत्साहात साजरा होणार आहे.  शिवछत्रपती घराण्याची भवानी तलवार फुलांनी सजवलेल्या पारंपरिक लाकडी पालखीत ठेवून मिरवणुकीने पोवई नाका येथील पूजनाच्या ठिकाणापर्यंत आणण्यात येईल.

सातारा- साताऱ्यात शनिवारी ऐतिहासिक 'शाही दसरा सोहळा' उत्साहात साजरा होणार आहे.  शिवछत्रपती घराण्याची भवानी तलवार फुलांनी सजवलेल्या पारंपरिक लाकडी पालखीत ठेवून मिरवणुकीने पोवई नाका येथील पूजनाच्या ठिकाणापर्यंत आणण्यात येईल. अखेर गाववेशीच्या बाहेर सीमोल्लंघन होईल. या पार्श्वभूमीवर 'भवानी तलवारी'च्या इतिहासावर 'लोकमत ऑनलाईन टीम'नं टाकलेली ही एक नजर..

छत्रपती शिवरायांच्या शस्त्रांपैकी ढाल,अंगरखा,बिचवा अशी अनेक शस्त्रे आज उपलब्ध नाहीत. परंतु त्यांच्या काही तलवारींपैकी तीन तलवारी 'जगदंबा,भवानी आणि तुळजा' या आजही अस्तित्वात आहेत. व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात वाघनखे आहेत. तलवारींपैकी जगदंबा ही तलवार लंडनमध्ये आहे. ती स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांनी पाहिल्याचे नमूद केले आहे. दुसरी 'भवानी तलवार' सध्याचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे आहे. 'तुळजा तलवार' सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात आहे. 

शिवछत्रपतींनी वापरलेल्या अनेक तलवारींपैकी ही एक भवानी तलवार. परमानंद नेवासकर कृत 'शिवभारत'मध्ये 'मी तुझ्या तलवारीमध्ये आशीर्वाद बनून राहीन,' अश्या अर्थाचा श्लोक होता. नंतर त्याचे 'भवानी आईने तलवार दिली,' असे रुपांतर झाले. रायगड पडला, तेव्हा झुल्फिकार खानच्या हातात भवानी तलवार पडली असावी. त्याचवेळी शाहू छत्रपती, राणी येसूबाई व इतर लोक कैद झाले. 

औरंगजेबाने येसूबाई आणि शाहू महाराजांची विशेष बडदास्त ठेवली. येसूबाई यांना स्वतः चा शिक्का व चरितार्थासाठी काही वतने दिली. तसेच शाहूंना 'सरकार राजा शाहू' अशी पदवी दिली. नंतरच्या काळात शाहू महाराज यांच्या लग्नप्रसंगी औरंगजेबाने भवानी तलवार, अफझलखानाची तलवार अन् काही रत्ने शाहूंना भेट दिली. नंतर ही तलवार शाहू महाराजांबरोबर साताऱ्यात आली. तीच तलवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या 'जलमंदिर'मध्ये आहे. त्यावर 'भवानी तलवार' असे कोरले आहे.

‘छत्रपतींच्या वारसांची राजधानी म्हणून साताऱ्याची ओळख आहे. भवानी तलवारीचे वास्तव्य असल्यामुळे साताऱ्याला विशेष मान आहे. छत्रपती शिवरायांची खरी ‘भवानी’ तलवार साताऱ्याच्या राजघराण्याकडे आहे. ही तलवार ब्रिटिशांनी नेल्याचा कांगावा केला गेला होता. वास्तविक ब्रिटिशांकडे जी तलवार आहे, तिचे नाव ‘जगदंब’ तलवार आहे,’ अशी माहिती इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत देतात.

'शिवछत्रपतींच्या जाज्वल्य इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या साताऱ्याचे नाव शौर्यपूर्ण गाथेत जोडले गेले आहे. मराठ्यांच्या गौरवपूर्ण इतिहासाचा मोठा ठेवा सातारकरांकडे सुरक्षित आहे. इतिहास कालीन संदर्भ, दगडी शिल्प आणि संग्रहित चित्रांचा आधार घेत शोध घेतला, तर या गोष्टी लगेच लक्षात येतात. जलमंदिरमधील भवानी मंदिरात ठेवण्यात आलेली तलवार आणि संग्रहित चित्रांमध्ये आढळून येणारे वैशिष्ट्ये तीच आहेत. तलवारीच्या नख्या, मूठ, वाटी, बाज, ठेवण पाती जशीच्या तशी असल्यामुळे ही तलवार राजघराण्याकडे असल्याचे सत्य अधोरेखित झाले आहे,' असेही इंद्रजित सावंत म्हणतात.
 

Web Title: Shiv Chhatrapati Bhavanani sword will be held in Satara tomorrow, Shahi Poojan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.