सरकार साजरा करणार शिवराज्याभिषेक सोहळा; १ व २ जूनला रायगडावर जंगी कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 07:37 AM2023-04-30T07:37:50+5:302023-04-30T07:38:16+5:30
तमाम मराठी जनांसाठी ही महत्त्वाची घटना आहे. सोहळ्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी करावी असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मुंबई - राज्य सरकार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला १ व २ जून २०२३ रोजी रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणार आहे. स्वराज्य, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त जिल्ह्याजिह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे राज्यभर प्रयोग आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. या सर्व नियोजनाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत आढावा घेतला.
तमाम मराठी जनांसाठी ही महत्त्वाची घटना आहे. सोहळ्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी करावी. शिवभक्तांची गैरसोय होणार नाही, यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. यावेळी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे, प्रशांत ठाकूर, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे आदी उपस्थित होते.
महाड ते पाचाड मोफत बससेवा
सोहळ्यादिनी शिवभक्तांसाठी मोफत बससेवा महाड ते पाचाडदरम्यान सुरू करावी. शिवभक्तांसाठी भोजन, पाणी, मंडप, आरोग्य सुविधा यांची चोख व्यवस्था करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.