एकच धून 6 जून! रायगडावर शिवराज्याभिषेक होणारच; छत्रपती संभाजीराजेंची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 06:09 PM2020-05-10T18:09:43+5:302020-05-10T18:11:34+5:30
रायगड किल्ला असलेला जिल्हा रायगड जरी ऑरेंज झोनमध्ये असला तरीही पुणे, सातारा, मुंबई आदी जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. यामुळे महिनाभरावर येऊन ठेपलेल्या शिवराज्याभिषेक सोहळा होणार की नाही यावर संभ्रम निर्माण झाला होता. आज छत्रपती संभाजीराजे भोसलेंनी यावर भूमिका स्पष्ट केली आहे.
मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही रायगडावरशिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. कोरोनाचे संकट असले तरीही त्यात खंड पडू देणार नसल्याचे छत्रपती संभाजीराजे भोसलेंनी म्हटले आहे.
देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनावर मात करण्यासाठी राज्यासह देशभरात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. राज्यात आता दिवसाला हजार-बाराशे कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. रायगड किल्ला असलेला जिल्हा रायगड जरी ऑरेंज झोनमध्ये असला तरीही पुणे, सातारा, मुंबई आदी जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. यामुळे महिनाभरावर येऊन ठेपलेल्या शिवराज्याभिषेक सोहळा होणार की नाही यावर संभ्रम निर्माण झाला होता. आज छत्रपती संभाजीराजे भोसलेंनी यावर भूमिका स्पष्ट केली आहे.
एकच धून 6 जून! असं म्हणत महाराष्ट्राच्या अन देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त कशाचीही पर्वा न करता दरवर्षी रायगडावर पोहोचत असतात. फक्त महाराजांचा राज्याभिषेक सोहळा डोळ्यांत साठवून घेण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करुन शिवभक्त गडावर येत असतात. गेली 14 वर्षं आपण हा सोहळा अगदी राजवैभवात संपन्न करत आहोत. शिवराज्याभिषेक सोहळा आता लोकोत्सव झाला आहे. देशभर किंबहुना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. गेल्या वर्षी 5 देशांचे राजदूत त्या त्या देशाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून राजसदरेवर महाराजांना मुजरा करण्यासाठी दाखल झाले होते, असे ट्विट संभाजीराजेंनी केले आहे.
यावर्षी सुद्धा माझ्या मनात अजून मोठं अन आगळं वेगळं नियोजन होतं. परंतु कोरोनामुळे सर्वत्र परिस्थिती अजूनही गंभीर आहे. कोरोनामुळे, दरवर्षी प्रमाणे शिवभक्तांना इच्छा असूनही लाखोंच्या संख्येने गडावर येता येणार नाही. संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने ते योग्यही आहे. कोरोनाचा संसर्ग अजून किती प्रमाणात वाढेल? लॉकडाऊनचा कालावधी अजून किती दिवस असेल? किती शिवभक्तांना गडावर जाण्याची परवानगी मिळेल? ह्याबाबत स्पष्टता येत नाही आहे. माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. या महिनाअखेरपर्यंत परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे संभाजीराजें म्हणाले.
शिवराज्याभिषेक सोहळा होणार पण...
यानंतर संभाजीराजेंनी शिवराज्याभिषेक सोहळ्यावरील भूमिका मांडली आहे. गेल्या काही दिवसांपासून मी महाराष्ट्रातील विविध भागांतील शिवप्रेमी, इतिहासकार, शिवराज्याभिषेक महोत्सव समिती चे सदस्य, अनेक दुर्गप्रेमी संस्थांचे सदस्य, संबंधित विविध संघटना, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार या सर्वांशी चर्चा करत आहे. निर्णय घेऊन सर्वांना कळवण्यात येईल. सर्व शिवभक्तांना मी एकच शब्द देतो, की महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पाडला जाईल. त्या परंपरे मध्ये खंड पडू देणार नाही. राजसदरेतील राज्याभिषेक सोहळा सर्व शिवभक्तांना थेट पाहता येईल याविषयी सुद्धा उपाय योजना करण्याचा माझा मानस आहे, असे संभाजी राजेंनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या...
Vidhan Parishad Election: ९ जागांसाठी १० उमेदवार; तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक
Vidhan Parishad Election: ...तर शिवसेनेने एक जागा कमी लढवावी, भाजपाचा युतीधर्मावरून टोला
Vidhan Parishad Election: राष्ट्रवादीकडून 'या' नेत्यांना विधान परिषदेची उमेदवारी
पीओकेवरून तणाव; पाकिस्तानची एफ १६, मिराज लढाऊ विमाने घिरट्या घालू लागली