VIDEO: बंदुका दाखवत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शिवसैनिकांचा ओव्हरटेक; व्हिडीओ व्हायरल
By कुणाल गवाणकर | Published: January 30, 2021 10:44 AM2021-01-30T10:44:24+5:302021-01-30T10:45:00+5:30
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट केला व्हिडीओ; कारवाईची मागणी
मुंबई: शिवसेनेचा लोगो असलेल्या वाहनातून प्रवास करत असलेले दोन जण बंदुका धाक दाखवत असल्याचा व्हिडीओ एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट केला आहे. रस्त्यावर बंदुका दाखवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जलील यांनी केली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर हा प्रकार घडल्याचं जलील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
जलील यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये रस्त्यावरील वाहनकोंडी दिसत आहे. एका कारचा चालक आणि त्याच्या मागील सीटवरील एकाच्या हातात बंदूक आहे. दोघांचेही हात कारच्या बाहेर आहेत. त्यांच्या हातात बंदूक आहे. त्या बंदुका इतर वाहनांमधील व्यक्तींना दाखवत दोघे जण कोंडीतून वाट काढत गाडी पुढे नेत आहेत. या कारच्या मागे असलेल्या वाहनातून व्हिडीओ चित्रीत करण्यात आला आहे.
हे महाराष्ट्रातील पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आहे ! वाहनवरील लोगो हे सर्व सांगते ! शुक्रवारी रात्री शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी मार्गक्रमण करीत असताना रिव्हॉल्व्हर्सचे ब्रँडिंग करीत होते. गृहमंत्री /पोलीस महानिरीक्षक या अधर्मची दखल घेऊ शकतात का! @AnilDeshmukhNCP@DGPMaharashtrahttps://t.co/SaWy3UVuH6
— imtiaz jaleel (@imtiaz_jaleel) January 29, 2021
खासदार इम्तियाज जलील यांनी व्हिडीओ ट्विट करत कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी व्हिडीओ ट्विटमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याच्या डीजीपींना टॅग केलं आहे. 'हा प्रकार मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर घडला आहे. कारवरील लोगो सगळं काही सांगून जातो. शुक्रवारी रात्री वाहतूक कोंडीतून वाट काढताना शिवसैनिक बंदुका दाखवत होते. गृहमंत्री, डीजी याची दाखल घेणार का?,' असा सवाल जलील यांनी विचारला आहे.