पाक छायाचित्रकारांच्या कार्यक्रमात शिवसैनिकांचा राडा

By admin | Published: June 28, 2016 08:17 PM2016-06-28T20:17:12+5:302016-06-28T20:37:38+5:30

मुंबई कराची फ्रेंडशिप फोरमने प्रेस क्लबमध्ये आयोजित केलेल्या पाक छायाचित्रकारांच्या कार्यक्रमात मंगळवारी शिवसैनिकांनी गोंधळ घातला. मात्र गोंधळ घालण्यापेक्षा एक छायाचित्रकार

Shiv Sainiks Rada in the program of Pakistan's photographer | पाक छायाचित्रकारांच्या कार्यक्रमात शिवसैनिकांचा राडा

पाक छायाचित्रकारांच्या कार्यक्रमात शिवसैनिकांचा राडा

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - मुंबई - कराची फ्रेंडशिप फोरमने प्रेस क्लबमध्ये आयोजित केलेल्या पाक छायाचित्रकारांच्या कार्यक्रमात मंगळवारी शिवसैनिकांनी गोंधळ घातला. मात्र गोंधळ घालण्यापेक्षा एक छायाचित्रकार म्हणून उद्धव ठाकरे यांनी पाक कलाकारांच्या छायाचित्र प्रदर्शनाला हजेरी लावावी, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांनी केले आहे. शिवाय पाकमध्ये मराठी उत्सवाचे आयोजन करणार असून त्यासाठीही शिवसेनेच्या नेत्यांना आमंत्रित करणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. ते म्हणाले की, गेल्यावेळीही शिवसैनिकांनी कार्यक्रम बंद पाडण्यासाठी माझ्या चेहऱ्याला व डोक्याला काळा रंग फासला होता. मात्र तरीही कार्यक्रम पार पडला. यावेळीही त्यांचा प्रयत्न फसलेला आहे. मुळात आजचा कार्यक्रम हा
भारत आणि पाकमधील छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: एक उत्कृष्ट छायाचित्रकार आहेत. त्यामुळे कलेच्या माध्यमातून दोन देशांत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी छायाचित्र प्रदर्शनाचे सादर आमंत्रणही त्यांना देणार आहे. शिवाय यापुढे जाऊन पाकिस्तानमध्ये मराठी उत्सव साजरा करण्याचे फोरमने ठरवले आहे. त्या उत्सवासाठीही ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या सर्व नेत्यांना आमंत्रित
करण्यात येईल.
या फोरमअंतर्गत मुंबईतील पाच छायाचित्रकार लवकरच पाकमधील कराची शहरात जाऊन छायाचित्रे घेणार आहेत. तर गेल्या आठवड्याभरापासून पाकमधील पाच छायाचित्रकार मुंबईत आहेत. या छायाचित्रकारांनी त्यांच्या कॅमेरात येथील
काही छायाचित्रे टिपली आहेत. या सर्व छायाचित्रांचे तस्वीर-ए-मुंबई आणि तस्वीर-ए-कराची अशी दोन स्वतंत्र प्रदर्शने भरवण्यात येतील. १४ व १५ आॅगस्ट रोजी म्हणजेच दोन्ही देशांच्या स्वतंत्रता दिनी हे प्रदर्शन मुंबई व कराचीमध्ये आयोजित केले जाईल, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

शिवसैनिकांची डाव फसला
सुधींद्र कुलकर्णी यांच्या कार्यक्रमाच्या सुरूवातील पाकविरोधात घोषणबाजी करत गोंधळ घालणाऱ्या शिवसैनिकांना आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यानंतर कुलकर्णी पत्रकार भवन बाहेर पडताच, त्यांची गाडी रोखून निदर्शने करण्याचा शिवसैनिकांचा डाव होता. त्यासाठी खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली काही शिवसैनिक मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दबा धरून बसले होते. मात्र पोलिसांनी कुलकर्णी यांना पत्रकार भवनच्या मागील बाजूस असलेल्या प्रवेशद्वारामधून गाडी नेण्याचे
आवाहन केले. त्यामुळे शिवसैनिकांनी भररस्त्यात गाडी रोखून गोंधळ घालण्याचा आखलेला डाव पुरता फसला.

मुंबईचा पाहुणचार आवडला!
पाकमधील मलिका अब्बास, फराह मेहबूब, आमेन जे., मोबेने अन्सारी आणि माल्कन हचेसन हे पाच छायाचित्रकार गेल्या सात दिवसांपासून मुंबईत आहेत. येथील विविध धर्मांच्या नागरिकांना त्यांनी भेटी दिल्या. मुंबईकरांनी केलेला पाहुणचार आवडल्याची प्रतिक्रिया या छायाचित्रकारांनी व्यक्त केली. पाकमध्ये चांगला पाऊस होत नसल्याने येथील पावसाने पाहुण्यांना विशेष मोहिनी घातल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांमधून जाणवले.

मराठी पुस्तकाचे पाकमध्ये पुन:प्रकाशन
पाकमधील कराची शहरात १९४६ साली तानाजी बाळाजी खरावतेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिलेल्या पहिल्या मराठी चरित्राचे प्रकाशन झाले होते. त्या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन करण्यासाठी लवकरच कराचीमध्ये एक
कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. शिवाय तेथील समुदायांच्या मदतीने मराठी, गुजराती, उर्दू, पारसी महोत्सवाचे आयोजन कराचीमध्ये करणार असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title: Shiv Sainiks Rada in the program of Pakistan's photographer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.