शिवसंग्राम पक्ष आगामी निवडणुकीत युती सोबतच : विनायक मेटे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 09:28 PM2018-09-11T21:28:45+5:302018-09-11T21:45:12+5:30
आता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसंग्राम पक्ष सर्व ताकदीने निवडणुकीमध्ये उतरणार आहे.
पुणे: आगामी वर्ष निवडणुकांचे वर्षे असून शिवसंग्राम पक्ष लोकसभा, विधानसभा निवडणुका भाजप युतीसोबत लढविणार असल्याची घोषणा आमदार विनायक मेटे यांनी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पक्ष प्रवेश व पदाधिकारी मेळाव्यात व्यक्त केले.
शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेचा मेळावा व कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम मेटे यांच्या उपस्थितीत पुण्यात राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल, सहकार नगर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मेटे बोलत होते. या मेळाव्यात अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद यांनी शिव-संग्राम पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष शैलेश सरकटे, प्रदेश सचिव शेखर पवार, जिल्हा संपर्क प्रमुख तुषार काकडे, शहराध्यक्ष भरत लगड, माजी विद्यार्थी महेंद्र कडू, किरण ओहोळ, बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते.
मेटे म्हणाले की, प्रस्थापित, सत्ताधा-यांनी आतापर्यंत विस्थापित, गोर-गरीब जनतेला अनेक गोष्टींपासून वंचित ठेवले आहे. पण आता शिवसंग्राम पक्षाच्या माध्यमातून राजकीय, समाजिक परिवर्तनाची लाट निर्माण करायची आहे. आगामी काळात पक्षात होणारे विविध व्यक्तींचे प्रवेश पाहून काही व्यक्तींकडून लोकांना वेगळे करण्याचा, संघटना तोडण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, आपण शिवाजीच्या विचाराने एक त्र आलो असल्याने त्याचा काही फरक पडणार नाही. मी देखील आपल्या सामाजिक ,राजकीय जीवनात वैयक्तिक स्वार्थासाठी कधीही सौदागिरी केली नाही. शेतकरी, मराठाच्या जीवावर राजकारण करणा-या राष्ट्रवादी काँग्रेसने आपले एकही आश्वासन पाळले नाही. त्यामुळे त्या पक्षातून बाहेर पडलो. आता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसंग्राम पक्ष सर्व ताकदीने निवडणुकामध्ये उतरणार आहे. आज आपले दोन आमदार आहेत. आगामी निवडणुकीत ही संख्या ५ ते १० पर्यंत जाण्याचा निर्धार केला पाहिजे.
---------------
सर्वसामान्यासाठी शिवसंग्राम पक्षात प्रवेश - अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद
काही वर्षांपूर्वी राजकारणात येईल असा विचार देखील मनात नव्हता. परंतु, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ पक्षाकडून पहिली निवडणूक लढवली. एका महिन्यात सर्व लोकापर्यंत पोहोचू शकले नाही. त्यानंतर पुन्हा कोणत्याही पक्षात प्रवेश करेल असे वाटत नव्हते. पण शिवसंग्राम पक्षाचे व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रुणहत्या आदी स्वरुपाचे काम पाहून या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मत अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद यांनी येथे व्यक्त केले. काही लोक मोठ-मोठी आश्वासने देऊन सत्तेत येतात. तर काही सत्तेत राहून एकमेकांचे पाय खेचतात आणि सत्तेचा आनंद देखील घेतात असा टोला देखील लगावला.