शिवसेना २२, काँग्रेस १६, राष्ट्रवादी १०; असे आहे महाविकास आघाडीतील संभाव्य जागावाटप
By यदू जोशी | Published: March 18, 2024 08:21 AM2024-03-18T08:21:09+5:302024-03-18T08:22:06+5:30
तिघांच्याही कोट्यातील काही जागा वंचितला देण्यात येणार
यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) २२, काँग्रेस १६ आणि राष्ट्रवादी (शरद पवार) १० जागा लढणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. रामटेकच्या जागेबाबतचा वाद होता, पण आता तेथे काँग्रेस लढेल आणि सांगलीमध्ये शिवसेना लढेल, असा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सांगलीमध्ये पहिलवान चंद्रहार पाटील शिवसेनेचे उमेदवार असतील. भिवंडीची जागा काँग्रेसऐवजी राष्ट्रवादी लढवेल. हातकणंगले येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी पाठिंबा देईल. ही जागा शिवसेनेच्या कोट्यातून शेट्टी यांना दिली जाईल.
कोट्यातील काही जागा वंचितला
- शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष आपापल्या कोट्यातील काही जागा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला देतील.
- तसा प्रस्ताव आंबेडकर यांना देण्यात आला आहे. ही संख्या चार ते पाच असू शकते. त्यात अकोला, नांदेडचा समावेश आहे, असेही समजते.
भाजप- शिवसेनेत चार जागांवर घमासान
- भाजप- शिवसेनेत चार जागांवर रस्सीखेच सुरू आहे. त्यात रामटेक, यवतमाळ- वाशिम, कोल्हापूर आणि उत्तर पश्चिम मुंबईचा समावेश आहे.
- चारही जागा शिवसेनेने २०१८ मध्ये जिंकल्या होत्या आणि तेथील खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.