Maharashtra Political Crisis: तेजस ठाकरेंवर लवकरच युवासेनेची मोठी जबाबदारी? आदित्य ठाकरेंचे सूचक विधान; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 10:20 AM2022-08-06T10:20:01+5:302022-08-06T10:20:24+5:30
Maharashtra Political Crisis: ऐतिहासिक संकटात सापडलेल्या शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी तेजस ठाकरे राजकारणात पदार्पण करू शकतात, या शक्यतेवर आदित्य ठाकरेंनी नेमकी प्रतिक्रिया दिली.
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा, शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यातच आता ठाकरे घराण्यातील तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांचा राजकारणात प्रवेश होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना सूचक विधान केले आहे.
शिवसेना सध्या ऐतिसहासिक संकटात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडून पुत्र तेजस ठाकरे यांच्यावरही युवासेनेची मोठी जबाबदारी देण्यात येईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. या चर्चेबाबत युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी खुलासा केला आहे.
तेव्हा तो याबाबत निर्णय घेईल
आदित्य ठाकरे यांनी तेजस ठाकरेंच्या सक्रिय राजकारणातील एण्ट्रीची चर्चा फेटाळून लावली आहे. या चर्चेवर विश्वास ठेवू नका. त्याला जेव्हा यायचे, तेव्हा तो याबाबत निर्णय घेईल, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. माध्यमांशी बोलताना विरोधक करत असलेल्या टीकेवर आदित्य ठाकरे यांनी उत्तर देताना आम्ही जनतेच्या कामात व्यस्त आहोत आणि ते राजकारणात व्यस्त आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, तीन पक्ष बदलून झालेले आणि चौथ्या पक्षात पदार्पण करण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांवर किती विश्वास ठेवायचा याचा आपण विचार करायला हवा. गौप्यस्फोट करण्याचा प्रयत्न ते करत आहे. मात्र त्यांनी एवढी कारणे दिली आहेत की मी शिवसंवाद यात्रेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईपर्यंत यांचे कारण बदललेले असते. कोणालाही गद्दारी पटलेली नाही. हे सरकार बेकायदेशीर आहे. विषय बदलत राहायचे, गोलपोस्ट बदलत राहायचे, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा हा एक प्रयत्न सुरू आहे. आमदारकीचा राजीनामा द्या निवडणुकीला सामोरे जा, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना दिले.