“सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीसांना वैफल्य, वागण्यातून ते दिसतंय”; आदित्य ठाकरेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 11:29 PM2022-02-13T23:29:39+5:302022-02-13T23:30:51+5:30

महाविकास आघाडीसह आम्ही सगळे संजय राऊत यांच्यासोबत आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

shiv sena aaditya thackeray replied devendra fadnavis criticism over maha vikas aghadi | “सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीसांना वैफल्य, वागण्यातून ते दिसतंय”; आदित्य ठाकरेंची टीका

“सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीसांना वैफल्य, वागण्यातून ते दिसतंय”; आदित्य ठाकरेंची टीका

Next

चंद्रपूर: राज्यातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा दिवसेंदिवस वाढत जात असल्याचे पाहायला मिळत आहे. यात आता राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही उडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या एका टीकेला प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीसांना वैफल्य आले आहे, असा पलटवार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. 

चंद्रपूर दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अलीकडेच राज्य सरकार कुठेच दिसत नसल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी १० मार्चनंतर महाविकास आघाडीचे सरकार पडेल, असा दावा केला आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

आम्ही सगळे संजय राऊतांसोबत आहोत

गेल्या दोन वर्षांपासून सरकार गेल्यापासून देवेंद्र फडणवीस यांना वैफल्य आले आहे. विरोधी पक्षाच्या वागण्यात ते दिसत आहे. कधी म्हणतात मुख्यमंत्री आहे, कधी म्हणतात नाही. कधी म्हणतात सरकार आहे, तर कधी म्हणतात नाही. मात्र, लोकांचा सरकारवर विश्वास आहे. जे डोळे बंद करुन फिरतात त्यांना काहीच दिसणार नाही, असा पलटवार आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावर बोलताना, आम्ही सगळे संजय राऊत यांच्यासोबत आहोत. तिन्ही पक्ष एकमेकांसोबत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी चंद्रपूर शहरातील गोंडकालीन रामाळा तलावाच्या काठाशी त्यांनी तलावाच्या खोलीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या कामाची पाहणी केली. याशिवाय, ईको प्रो संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या गोंडकालीन 12 किलो मीटर लांब किल्ला परकोट ‘हेरिटेज वॉक’च्या बगड खिडकी टप्प्याची पाहणीही केली. विशेष बाब म्हणते आदित्य ठाकरे या वॉकमध्येही सहभागी झाले.
 

Web Title: shiv sena aaditya thackeray replied devendra fadnavis criticism over maha vikas aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.