Aaditya Thackeray Vs BJP: फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये! आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात, भाजपचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 04:17 PM2022-09-13T16:17:30+5:302022-09-13T16:18:29+5:30
वसुली कारभारामुळे किती उद्योग गेल्या अडीच वर्षात राज्याबाहेर गेले, याचे उत्तर आदित्य ठाकरेंनी द्यावे, या शब्दांत भाजपने पलटवार केला आहे.
Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेसह महाविकास आघाडीचे नेते सातत्याने विविध मुद्द्यांवरून टीका करताना दिसत आहेत. यातच आता महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात अंतिम टप्प्यात आलेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. यावरून आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली असून, भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेदांता-फॉक्सकॉनने आपला सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करणार असल्याची घोषणा केली. वेदांता रिसोर्स लिमिटेडचे चेअरमन अनिल अग्रवाल यांच्या ट्विटचा दाखला देत आदित्य ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली आहे. ज्या प्रकल्पासाठी आम्ही सरकारमध्ये असताना खूप प्रयत्न केले, तो फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जातोय आणि त्यासाठी काही मंडळींनी प्रयत्न केला, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.
श्रेय शिंदे-फडणवीसांच्या सरकारने घेतले होते
या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातून १ लाख ५४ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार होती. पण हा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्र पुन्हा एकदा मोठ्या प्रकल्पाला मुकल्याची चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडी सरकारने फॉक्सकॉन प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आणली होती. ठाकरे सरकार बदलल्यानंतर फॉक्सकॉन प्रकल्पाचे श्रेय शिंदे-फडणवीसांच्या सरकारने घेतले होते. पण हा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर घालविण्याचा काही जणांचा उद्देश होता, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरेंच्या टीकेला भाजपचे प्रत्युत्तर
भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंच्या आरोपाला उत्तर दिले आहे. वसुली कारभारामुळे किती उद्योग गेल्या अडीच वर्षात राज्याबाहेर गेले याचे उत्तर आदित्य ठाकरे यांनी द्यावे. नंतर फॉक्सकॉनच्या थापा माराव्यात, असा पलटवार करत अडीच वर्षात महाविकास आघाडीने कोणता प्रकल्प महाराष्ट्रात आणला होता? जो प्रकल्प गुजरातला गेला म्हणून आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे, तो वेदांत आणि फॉक्सकॉन कंपनीचा जॉइंट व्हेंचर प्रकल्प गुजरातमध्ये उभा करण्याचं त्या दोन कंपन्यांनी ठरवलं आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, मात्र मविआ सरकारच्या काळात तो प्रकल्प महाराष्ट्रात उभा राहू शकला नाही. तो कर्नाटकला गेला, मग मविआने सारवासारव केली तो प्रकल्प नाहीये, तो केवळ डेस्क आहे. हा सगळा ढोंगीपणा आहे, दुसरं तिसरं काही नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी वेदांता-फॉक्सकॉनच्या या प्रकल्पाला शुभेच्छाही दिल्या. तसेच विकासाचा नवा मार्ग निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करत महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याला देशाच्या विकासात मोठे योगदान देणारे राज्य करण्याचे प्रयत्न केल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. दुसरीकडे, अनिल अग्रवाल यांनी आपल्या ट्वीटमध्ये गुजरात सरकार आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचेही आभार मानले.