तटकरेंच्या पुतण्याचा शिवसेनेत प्रवेश
By Admin | Published: November 7, 2016 06:54 AM2016-11-07T06:54:09+5:302016-11-07T06:54:09+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुतणे संदीप तटकरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुतणे संदीप तटकरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. संदीप यांनी रोहा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला असून शिवसेनेच्या पाठिंब्यावर ते लढणार असल्याने तटकरे यांना आता घरातूनच आव्हान मिळाले आहे.
संदीप हे सुनील तटकरेंचे बंधू अनिल तटकरेंचे सुपुत्र आहेत. रविवारी दादर येथील शिवसेना भवनात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री अनंत गिते, आमदार भरत गोगावले आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर उपस्थित होते. संदीप तटकरेंचा शिवसेना प्रवेश कोकणात राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. रोहा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी संदीप इच्छुक होते. मात्र, तटकरे यांनी आपले वजन व्याही संतोष पोटफोडे यांच्या पारड्यात टाकून त्यांना पक्षाची उमेदवारी दिल्याने काका-पुतण्यात ठिणगी पडली. संदीप यांनी रोहा नगराध्यक्षपदासाठी शड्डू ठोकल्याने राष्ट्रवादीसाठी मोठे आव्हान मानले जात आहे.
ये तो झांकी है...!
केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गिते यांनी ‘ये तो बस झांकी है, आगे बहोत कुछ बाकी है’ अशी सूचक प्रतिक्रिया देत शेकापमधील काही पदाधिकारी लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले. संदीप तटकरे यांच्यामुळे रोहा नगरपालिकेवर सेनेचा भगवा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (विशेष प्रतिनिधी)