तेरणा शाळेवर शिवसेनेचीही धडक
By Admin | Published: June 29, 2016 02:16 AM2016-06-29T02:16:34+5:302016-06-29T02:16:34+5:30
नेरूळमधील तेरणा शाळेतील फीवाढ व शैक्षणिक साहित्य शाळेतूनच घेण्याच्या सक्तीविरोधात शिवसेनेने आंदोलन केले.
नवी मुंबई : नेरूळमधील तेरणा शाळेतील फीवाढ व शैक्षणिक साहित्य शाळेतूनच घेण्याच्या सक्तीविरोधात शिवसेनेने आंदोलन केले. आंदोलनानंतर साहित्य शाळेतून घेण्याची सक्ती केली जाणार नसल्याचे व फी कमी करण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने दिले आहे.
शाळा व्यवस्थापनाने केलेली फीवाढ रद्द करावी यासाठी काही पालकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती. यामुळे शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी आंदोलन करण्यात आले. शाळेबाहेर घोषणाबाजी करून व्यवस्थापनाच्या मनमानीचा निषेध करण्यात आला. पालकांना शाळा सुरू होण्यापूर्वी गणवेश व इतर साहित्यासाठी २५०० रुपये शुल्क सांगण्यात आले होते. परंतु त्यामध्ये अचानक वाढ केली आहे. शैक्षणिक शुल्कही अचानक वाढविले आहे. ही सर्व शुल्कवाढ कमी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती केली जाणार नसल्याचे आश्वासन यावेळी व्यवस्थापनाने दिले. याशिवाय मराठी माध्यमाची फी वाढविलेली नाही. मुलांसाठी जादा सुविधा दिल्या जाणार असून त्यासाठी शुल्क आकारले असल्याचे सांगितले. वाढीव फी काही प्रमाणात कमी केली जाणार असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. आंदोलनामध्ये बेलापूर मतदार संघाचे संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे, मनोहर गायखे, रंजना शिंत्रे, विजय माने, काशिनाथ पवार, रतन मांडवे, रंगनाथ औटी, दिलीप घोडेकर, शिवाजी महाडिक, समीर बागवान व इतर पदाधिकारी उपस्थित होते.