सोशल मीडियावर शिवसेनाही कनेक्ट

By admin | Published: July 19, 2016 03:21 AM2016-07-19T03:21:55+5:302016-07-19T03:21:55+5:30

लोकसभा आणि त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा तसेच कल्याण-डोंबिवली निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपाने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार केला

Shiv Sena also connected on social media | सोशल मीडियावर शिवसेनाही कनेक्ट

सोशल मीडियावर शिवसेनाही कनेक्ट

Next


ठाणे : लोकसभा आणि त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा तसेच कल्याण-डोंबिवली निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपाने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार केला होता, त्याच धर्तीवर आता शिवसेनेने ठाण्यात भाजपाला शह देण्यासाठी सोशल मिडियाचा आधार घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार, आगामी निवडणुकीची रूपरेषा ठरवण्यासाठी तसेच आंदोलने, कार्यक्रम आदींची माहिती एका क्लिकवर स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यालादेखील मिळावी, म्हणून आतापासूनच शिवसेनेने हायटेक प्रचाराला सुरुवात केली आहे. यासाठी सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर चार प्रकारचे ग्रुप तयार करण्यात आले आहेत.
येत्या काही महिन्यांत ठाणे महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा हे स्वतंत्र लढतील, अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच या दोन्ही पक्षांनी एकमेकांना शह देण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. डोंबिवलीचे भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लावून त्यांच्या खांद्यावर ठाण्याची जबाबदारी टाकली जाणार आहे.
चव्हाण यांना ठाण्याच्या राजकारणात उतरवून शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्याचा यातून प्रयत्न होणार आहे. येत्या दिवाळीपूर्वी मेट्रोचे भूमिपूजन होणार असल्याने त्याचे श्रेय घेण्यासाठी भाजपा आतापासूनच सरसावली आहे. क्लस्टर असो
अथवा इतर कोणत्याही चांगल्या कामांचे श्रेय असो, यासाठी शिवसेना आणि भाजपामध्ये चढाओढ लागली आहे.
कल्याण-डोंबिवलीत भाजपाने ज्या पद्धतीने इतर पक्षांचे नगरसेवक फोडून शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवण्याचा प्रयत्न केला होता, तसाच प्रयत्न आता ठाणे महापालिकेतही होणार आहे. त्यामुळे शिवसेना आधीपासूनच सावध झाली असून त्यांनी नुकतेच मनसेचे दोन नगरसेवक आपल्या दावणीला बांधले आहेत. तसेच येत्या काही काळात काँग्रेस- राष्ट्रवादीचेदेखील काही मातब्बर नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे येथे शिवसेनेने भाजपाला आधीच शह देण्याचा प्रयत्न केला आहे.
शिवसेनेने सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर चार प्रकारचे ग्रुप तयार केले असून विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि त्या सर्वांवर नियंत्रण ठेवणारा एक ग्रुप तयार केला आहे. यावर, महापौर संजय मोरे हे जातीने लक्ष ठेवणार असून मातोश्रीवर किंवा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या विषयांची चर्चा या ग्रुपच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी केली जाणार आहे.
>पक्षाची बांधणी असो, इतर पक्षांतील कार्यकर्ते फोडण्याचे काम असो अथवा आंदोलने, कार्यक्रम आदी सर्वांची माहिती एका क्लिकवर प्रत्येक कार्यकर्त्याला या ग्रुपच्या माध्यमातून दिली जात आहे. एकूणच या माध्यमातून आता शिवसेनेने पक्षबांधणी आणि प्रचाराची मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसत आहे.

Web Title: Shiv Sena also connected on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.