निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप एकत्र येतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2017 02:14 AM2017-01-31T02:14:55+5:302017-01-31T02:14:55+5:30
निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप हे होतच राहणार, पण भाजप-शिवसेना हे नैसर्गिक मित्रपक्ष असून निवडणुकीनंतरही हे पक्ष एकत्र येतील, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर : निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप हे होतच राहणार, पण भाजप-शिवसेना हे नैसर्गिक मित्रपक्ष असून निवडणुकीनंतरही हे पक्ष एकत्र येतील, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री पाटील म्हणाले, शिवसेना-भाजप हे एकाच विचाराचे व संस्कृतीचे आहेत. एकमेकांची वैचारिक दोस्ती असून वैचारिक अजेंडाही एकच आहे. त्यामुळे आता युती तुटली असली तरी दोन्ही पक्षांनी एकमेकांवर असे आरोप करू नयेत की पुन्हा एकत्र यायला संकोच होईल. पुन्हा एकत्र यायचे असल्यास दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आसूड ओढू नयेत. शिवसेना-भाजपचं सरकार पाच वर्षे राहणार असून शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही आणि राष्ट्रवादीची भाजपला गरजही भासणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपसोबत नसल्याचे आपल्याला दु:ख होतं आहे, असे असले तरी अजूनही खासदार राजू शेट्टी यांच्याशी आपली चर्चा सुरू आहे. मनसे आणि शिवसेना एकत्र आले तरी मुंबईत भाजप किमान ११५ जागा जिंकेल आणि महापौर भाजपचाच असणार आहे. लोकसभा, विधानसभा व नगरपालिका निवडणुकीतील यशानंतर जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकीत यश मिळाल्यावर हे यशाचे वर्तुळ पूर्ण होईल. निवडणुकांसाठी जुने-नवे कार्यकर्ते त्याचबरोबर पक्ष व अन्य पक्ष यांचा समतोल चांगल्या पद्धतीने साधण्यात यश मिळाले आहे. (प्रतिनिधी)
लोकशाहीत कोणालाही बोलायला अधिकार
जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘शिवसेनेला जागा देणारे ‘दादा’ कोण ?’ अशी टीका चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वी शिवसेना नेत्यांकडून झाली होती. याबाबत विचारल्यावर चंद्रकांतदादांनी ‘लोकशाहीत कोणालाही बोलायला अधिकार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जर लोक बोलत असतील तर मी सर्वसामान्य माणूस आहे,’ असे उत्तर दिले.