भाजप-मनसे युतीची शक्यता; शिवसेना नव्या मित्राच्या शोधात, लवकरच मोठी घोषणा?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 11:02 AM2022-04-19T11:02:38+5:302022-04-19T11:03:46+5:30
भाजप-मनसेच्या संभाव्य युतीची धास्ती; शिवसेना नव्या मित्राच्या शोधात
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा हाती घेऊन आक्रमक हिंदुत्वाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. राज यांच्या आव्वाजाला भाजपनं भोंगे पुरवून पाठबळ दिलं आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना सध्या नव्या मित्राच्या शोधात आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. यानंतर भाजपनं अनेकदा शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेनेनं सत्तेसाठी हिंदुत्व सोडल्याचं भाजप नेते वारंवार म्हणतात. त्यामुळे हिंदुत्ववादी मतं हातून जाण्याची मतं शिवसेनेला आहे. दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत शिवसेनेची स्पेस व्यापण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे शिवसेनेचा मतदार मनसेकडून वळू शकतो. हा घडामोडी लक्षात घेऊन शिवसेना स्थानिक स्वराज संस्थांमध्ये नवा भिडू शोधत आहेत.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची मनं जुळतील का, याची चाचपणी राष्ट्रवादीकडून सुरू आहे.
भाजप-मनसेची युती होणार?
मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा हाती घेतला. भूमिपुत्रांच्या रोजगाराचा मुद्दा हाती घेऊन परप्रांतीयांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मनसैनिकांनी परप्रांतीयांना मारहाणदेखील केली. त्यामुळे भाजपला मनसेसोबत युती करण्यात अडचणी येत होत्या. मात्र आता राज यांनी आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. त्यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात थेट भूमिका घेतली आहे. त्याचे परिणाम उत्तर प्रदेशातही पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे लवकरच अयोध्येचा दौराही करणार आहेत. त्यामुळे भाजप-मनसे युती होण्याची शक्यता वाढली आहे.