शिवसेना, राष्ट्रवादीत मुख्यमंत्री, गृहमंत्रिपदाच्या अदलाबदलीची शक्यता; बड्या नेत्याचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 02:27 PM2022-04-01T14:27:02+5:302022-04-01T14:30:21+5:30
गृह मंत्रालयाच्या कारभारावर शिवसेना नाराज; राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदासाठी उत्सुक; अदलाबदल होऊ शकते; मुनगंटीवारांचा गौप्यस्फोट
मुंबई: केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीतील नेत्यांच्या चौकशा सुरू असताना, ईडीचं धाडसत्र सुरू असताना राजकीय वर्तुळात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये तासाभरापासून चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक गौप्यस्फोट केला आहे.
शिवसेना गृहमंत्रालयाच्या कारभारावर नाराज असल्याची चर्चा असताना मुनगंटीवार यांनी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदाची अदलाबदली केली जाऊ शकते, असं विधान केलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला. राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदासाठी उत्सुक आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदाची केली जाण्याची शक्यता आहे. तशी चर्चा मी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान ऐकली होती, असं मुनगंटीवार म्हणाले.
शिवसेना, मुख्यमंत्री ठाकरे गृह मंत्रालयावर नाराज असल्याचं समजतं. पण त्यांना गृह मंत्रालय का हवंय, हा प्रश्न महत्त्वाचा असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. 'महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी, गैरव्यवहार करणाऱ्या माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी शिवसेनेला गृहमंत्रिपद नकोय. त्यांना सूडाचं राजकारण करायचंय. भाजपच्या नेत्यांना अडकवायचं आहे. त्यासाठीच त्यांना गृहमंत्रालय हवं आहे,' असा आरोप त्यांनी केला.
विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सूडानं वागत नसतील, तर ती आनंदाची बाब आहे. त्यासाठी मी त्यांचं आणि राष्ट्रवादीचं अभिनंदन करतो. वळसे पाटील सूडबुद्धीनं वागत नसतील तर त्यात आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही, असंही मुनगंटीवार पुढे म्हणाले.
भाजप खोटारडा पक्ष- मिटकरी
मुनगंटीवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे. 'भाजप खोटारडा पक्ष आहे. मुनगंटीवार यांच्या विधानाकडे एप्रिल फूल म्हणून बघा,' असा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्तापिपासू पक्ष नाही. तो गुण भाजपमध्ये आहे. मुनगंटीवारांनी आमची काळजी करू नये, अशी टीका मिटकरींनी केली.